ग.दि.माडगुळकर कृत ओवीबद्ध सार्थ अथर्वशीर्ष

सुप्रसिद्ध साहित्यीक आणि ‘गीतरामायण’ कार ग. दि. माडगुळकर यांनी अथर्वशीर्ष मराठी ओवीबद्ध स्वरूपात गीतबद्ध केले आहे. हे गीतांतर वाचतांना मूळ संस्कृत अथर्वशीर्षाचा अर्थ सहजपणे समजून येतो. गदिमा हे भावसिद्ध कवी होते आणि त्यांच्या काव्यावर संतकाव्याचा आणि महाराष्ट्रातील शाहीरीचा प्रभाव असल्यामुळे अथर्वशीर्षाचे हे वाचन सुगम सुश्राव्य आणि रसाळ वाटते. ते आधुनिक काळातील, मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते.

त्यांच्या गीत रामायणाने अखिल महाराष्ट्राला वेड लावले आहे. या गणेशोत्सवात दहा दिवस आपण त्यांनी केलेल्या ओवीबद्ध अथर्वशीर्षाचा अर्थ समजाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मूळ अथर्वशीर्षाची सुरुवात उपनिषदाने होते आणि याची इतिश्री श्रीगणेशाची आठ नावे घेऊन होते. या लेखमालेत आधी मूळ संस्कृत श्लोक, त्यानंतर ग. दि. माडगूळकर यांनी केलेली रचना आणि त्यानंतर त्या रचनेचा अर्थ या क्रमाने एक एक श्लोक घेतला आहे.

२०१९-२०२० ही ग.दि. माडगूळकरांची जन्मशताब्दी. त्या निमित्त ही आदरांजली आपण त्यांना अर्पण करू या.

This image has an empty alt attribute; its file name is 103989624_1805612359580345_4046323288450528471_n.jpg
 त्वमेव केवलं कर्ताऽसि | त्वमेव केवलं धर्ताऽसि |
 त्वमेव केवलं हर्ताऽसि | त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि |
 त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ||१||
 तूं तो ओंकार साकार | अखिल विश्वाचा आधार ||
 मूल तत्त्व निराकार | तोहि तूंची गणेशा ||
 तूंच या विश्वाचा निर्माता | तूंच कर्ता चालविता ||
 तूंच अंती लयकर्ता | त्रिगुणांची मूर्त तू ||
 निर्गुण अथवा सगुण | तया मुळीचे ब्रम्हपण ||
 ते हि साक्षात श्रीगजानन | निःसंदेह बोलतो ||
 दृश्य जगतीचे चेतन | आत्मरुप कानडें गहन ||
 तें हि प्रत्यक्ष श्री गजानन | अनंत आणि निरंतर ||
 
 ग.दि.मा. 

विश्वाच्या उत्पत्तीला घोंगावणारा ॐकार तुझ्यात प्रत्यक्ष साकारलेला आहे. या विश्वाचा तू आधार आहे. आकारात व्यक्त न होणारे तुझे हे रूप अगाध आहे. सृष्टीचा निर्माता, कर्ता आणि धर्ता या त्रिगुणाची मूर्ती तू आहे. निर्गुण आणि सगुण परमात्म्याचे तू रूप आहे. साध्या डोळ्यांनी तुझे चेतन रूप उमजत नाही, तुझे अंतरंग समजाऊन घ्यायचे झाल्यास थेट तुझ्या हृदयाशी संवाद साधावा लागतो. तेंव्हा कुठे तुझे अनंत स्वरूप समजते.

 ऋतं वच्मि | सत्यं वच्मि || २||
 माझे बोलणे व्यावहारिक | जे आधीचेच सत्य तात्त्विक ||
 त्याचे प्रवचन प्रामाणिक | तुज पुढती मांडितो ||
 
 ग.दि.मा. 

दोन ते सहा या पांच श्लोकांमध्ये गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन केले आहे. मूळ अथर्वशीर्षात ही स्तवने गणेशाची  स्तुतिपर वर्णने आहेत. अथर्वशीर्षाची मूळ संस्कृत रचना अथर्व ऋषि यांना स्फुरण पावली. गणेश स्तुतीला प्रारंभ करण्यापूर्वी या श्लोकात ते म्हणतात ‘सत्य आणि रोकडे जे काही सांगता येईल ते प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न मी करतो आहे.’

 अव त्वं माम् | अव वक्तारम् | अव श्रोतारम् | अव दातारम् |
 अव धातारम् | अवानूचानमव शिष्यम् | अव पश्चात्तात् | अव पुरस्तात् |
 अवोत्तरात्तात् | अव दक्षिणात्तात् | अव चोर्ध्वात्तात् |
 अवाधरात्तात् |सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् || ३ ||
 अभय असो मज वक्त्यासी | अभय असो गा श्रोत्यासी ||
 अभय असो गा दात्यासी | परोपकारी सज्जनां ||
 जे जे या त्रिजगती | ब्रम्हविद्या संपादिती ||
 तयांच्या राहोनी मागे पुढती | रक्षी देवा गणेशा ||
 वाम अथवा दक्षिणदिशी | अंतराळी वा भूप्रदेशी ||
 जेथून उगम संकटांशी | तेथे उभा ऐस तू ||
 
 ग.दि.मा. 

या श्लोकात अथर्व ऋषी सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी गणेशाची प्रार्थना करतात. ग. दि. मा. या श्लोकाचे गीतांतर करताना सहजपणे म्हणतात, वक्ता आणि श्रोता यांना अभय असू दे त्याचप्रमाणे देणाऱ्याचे आणि घेणाऱ्याचे रक्षण कर. ब्रह्मविद्या संपादन करणाऱ्या गुरु-शिष्यांना तुझा आधार असू दे. जमिनीवर अथवा आसमंतातून, कोणत्याही दिशेने संकट आले तरी आमच्या पाठीमागे तू उभा रहा.  

 त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय: | त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः | त्वं सच्चिदानंदाद्द्वितीयोऽसि |
 त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि | त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि || ४||
 वेदशास्त्रादि वाङ्मय | तोहि तुझाचि रुपप्रत्यय ||
 शब्दातीत वा अव्यय | ते ही तुझीच गुणव्याप्ती ||
 नामरुपाचा अहंभाव | धरोनी नांदे जड जीव ||
 तयाचाहि होई संभव | तुझिया रुपीं अनंता ||
 तूं अविनाशी चैतन्यमय | आनंदरुपी आनंदमय ||
 साक्षात ब्रम्ह जे अद्वितीय| आदितत्व तूंचि ते ||
 तू चि ब्रम्ह ब्रम्हज्ञान | तूंच माया आणि विज्ञान ||
 भौतिकाचेही अधिष्ठान | तुझिया रुपे गोंवले ||
 
 ग.दि.मा. 

या श्लोकातला गूढ अर्थ सर्व सामान्यांना समजाऊन सांगताना गदिमा गणेशाची स्तुति करतात. वेदशास्त्र आणि सर्व साहित्य संपदा ही तुझीच रुपे आहेत. शब्द असोत की अव्यये ती देखील तुझ्याच गुणांचा विस्तार आहे. एवढेच नव्हे तर आमच्यासारखे वृथा अभिमान असणारे नामधारी जीव यामध्ये देखील तूच असण्याचा संभव नाकारता येत नाही. तू अविनाशी आहेस, चैतन्य आहेस. तू आनंदमयी आणि साक्षात अद्वितीय ब्रह्म आहेस. तू आद्य तत्व तर आहेसच, तूच स्वप्नवत माया अन विज्ञानरूपी वास्तव देखील आहेस.    

 सर्वं जगदिदं त्वत्तो जायते | सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति |
 सर्वं जगदिद त्वयि लयमेष्यति | सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति |       
 त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभ: | त्वं चत्वारि वाक्पदानि || ५ ||
 सृष्टि तुझिया मधुनी उपजे | तुझिया मुळेचमाया सजे ||
 तुझिया ठायीच अंती थिजे| ऐसे वेदांत बोलतो ||
 तूंच पृथ्वी आणि आकाश | वायु वारि वा प्रकाश ||
 अवघ्या भूतांचा आवेश | तव चैतन्य निर्मिते ||
 परा पश्यंती,वैखरी | मध्यमेसह वाणी चारी ||
 त्याहि तुझिया निराकारी | आकारी गणेशा ||
 
 ग.दि.मा. 

हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले. हे सर्व जग तुझ्यामुळे चालते, हे सर्व जग तुझ्यातच नष्ट होते असे वेदान्त सांगतो. तू भूमी आणि आकाश आहेस, तूच जल, वायु आणि प्रकाश आहेस. तुझ्यामध्ये पंचमहाभूतांचा वास आहे. तूच चैतन्याची निर्मिती करतोस. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी हे वाणीचे चार स्तर आहेत. आपण तोंडाचा वापर करून बोलतो ती वाचा म्हणजेच वैखरी, हे वाणीचे स्पष्ट रूप आहे. बोलण्याआधी विचार केला जातो ती मध्यमा वाणी, एखादी गोष्ट जाणून घेताना पश्यन्ति वाणीचा उपयोग केला जातो. आपल्या आवाक्यापालिकडे असलेल्या अव्यक्त ज्ञानाचे आकलन होण्यासाठी परा वाणीचा आध्यात्मिक वापर ऋषि करत असत. या चारही वाणींच्या पलीकडे असणारे अगाध ज्ञान तू जाणतोस.  

 त्वं गुणत्रयातीत: | त्वं देहत्रयातीत: | त्वं कालत्रयातीत: | 
 त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् | त्वं शक्तित्रयात्मक: |
 त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् | त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं |
 रूद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं | वायुस्त्वं सूर्यंस्त्वं चंद्रमास्त्वं |
 ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ||
 जे सत्त्व,रज,तमांकित | तूं तयाच्या न अंकित ||
 तिन्ही वेगळा त्रिगुणातीत | सर्व सर्वापार तू ||
 स्थूल ,सूक्ष्म आणि कारण | तया वेगळा देहहीन ||
 भूत,भविष्य,वर्तमान | यांच्या पैलाड ठाकसी ||
 मानवदेही,मूलाधार | चक्र जे निराकार ||
 तेथ तुझा अविष्कार | नित्य वास्तव्य नांदते ||
 जनन,रक्षण,संहरण | तिन्हीचे तू अधिष्ठान ||
 योगी करिती तुझेच ध्यान | स्वसंवेद्य आद्य तू ||
 विष्णू करी जगरक्षण | रुद्र करतो संहरण ||
 तया देवतांचे एकपण | तुझिया अंगी जागते ||
 इंद्र देवांचा राज्यकर्ता |अग्नि यज्ञाचा हव्यभोक्ता ||
 वायु वाहता ,प्राणदाता | सारी रुपे तुझीच ही ||
 प्रकाशदाता श्री भास्कर|चंद्र औषधीचा ईश्वर ||
 तया उभयतांचे सहस्त्रकर|तेजो वलये तुझीच ती ||
 ब्रम्हलोक वा भूस्थल | अंतरिक्ष वा स्वर्गलोक थोर ||
 प्रणवाक्षर की ओंकार | तोहि तूची समर्था ||
 
 ग.दि.मा. 

तू तीन गुणांच्या (सत्त्व, रज, तम) पलीकडील आहेस. थोडक्यात, तुझे वर्णन करणे देह, काल, अवस्था (जागृती, निद्रा, स्वप्न) यांच्यापलीकडे आहे. योगी लोक सतत तुझेच ध्यान करतात. विष्णु जगाचे रक्षण करतो, रुद्र दैत्यांचा संहार करतो. इन्द्र देवांचा राजा तर अग्नि यज्ञात अर्पण केल्या जाणाऱ्या हव्यद्रव्याचा भोक्ता. मोकळा वाहणारा प्राणवायु असो, की प्रकाश देणारे चंद्र, सूर्य असो. ही सर्व तुझीच रुपे आहेत याची आम्हाला जाणीव आहे. भू, भुवः, स्वः, हे तिन्ही लोक तुझ्यात सामावलेले आहेत. मनुष्य प्रथम भूमीवर जगतो. मृत्यूनंतर आत्मा भुवः लोकात जातो, तिथून जसजसा तो पवित्र होत जातो, तसतसा तो स्वः मः जनः तपः लोकांतून शेवटी सत्य लोकात जातो. पैकी पहिल्या तीन लोकात श्रीगणेशाचे वर्चस्व आत्म्यावर असते.)

 गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम् | अनुस्वार: परतर: | 
 अर्धेंदुलसितम् | तारेण ऋद्धम् | एतत्तव मनुस्वरूपम् |
 गकार: पूर्वरूपम् | अकारो मध्यमरूपम् | अनुस्वारश्चान्त्यरूपम् |
 बिंदुरुत्तररूपम् | नाद: संधानम् | संहिता संधि: | सैषा गणेशविद्या | 
 गणकऋषि: | निचृद्गायत्रीच्छंद: | गणपतिर्देवता | ॐ गँ गणपतये नम: ||७||
 ’ग’ वर्णाचा करुनी उच्चार | त्यांत मिसळावा अ’ कार स्वर ||
 अर्धेदुवत अनुस्वार | तत्संगती बोलावा ||
 मग होईल पूर्णोच्चार | मूलाधार जे प्रणवाक्षर ||
 सवर्ण नाद जो ओंकार | रुपमांगल्य ते तुझे ||
 प्रारंभ रुप तो ग कार | मध्यम रुप तो अ कार ||
 अंत्यरुप अनुस्वार | बिंदु उत्तर रुप ते ||
 या सर्वांचा एकत्रित नाद | स्वरास्वरांचा सुसंवाद ||
 तोचि अनादि ब्रम्हनाद | ओंकार मंगल बोलीजे ||
 हाचि तुझा नाममंत्र | हाचि प्रसिध्द सर्वत्र ||
 हा उच्चारितां अहोरात्र | मुक्ती पायीं लोळती ||
 या मंत्राच्या सामर्थ्याशी | द्रष्टा झाला गणकऋषी ||
 निचृत गायत्री छंदाशी | भूषविलें मंत्राने ||
 ॐ गं गणपतयेनमः | हाच मंत्र ,मंत्रमहिमा ||
 याच्या शक्तीस ना सीमा | अष्टाक्षरी मोक्ष या ||
 
 ग.दि.मा. 

ग आणि अ चा एकत्र उच्चार करावा. त्यावर अर्धचंद्र आणि अनुस्वार बोलावा.  गं या अक्षरात व ॐ या अक्षरात श्रीगणेश सामावलेले आहेत. हेच ते प्रणवाक्षर. प्रारंभी ग उच्चारावा त्यात मध्ये अ कार घ्यावा, अंती अनुस्वार बोलावा. या सर्वचा एकत्रित नाद, तोच हा अनादि ब्रह्मनाद. ॐ नि गं ही गणेशविद्येची वैदिक रूपे आहेत. हाच तो प्रसिद्ध गणेश मंत्र ज्याचा उच्चार केला असता सहज मुक्ती प्राप्त होते. सर्व विद्यांचे मूळ तेच आहे. या मंत्राचा कर्ता गणक ऋषी, ‘निचृद्गायत्री’ या छंदामद्धे गायला जाणारा हा मंत्र म्हणून मी गणपतीला वंदन करतो. या मंत्राच्या शक्तीला सीमा नाही असे वर्णन ग दि माडगूळकर करतात. हा अष्टाक्षरी मंत्र म्हणजेच मोक्ष आहे.

 एकदंताय विद्महे | वक्रतुंडाय धीमहि | तन्नो दंती प्रचोदयात् || ८ ||
 एकदंताचे महात्म | मियां जाणिले निश्चित || वक्रतुंड झाला ज्ञात | त्यासी घ्यातो अहर्निसी ||
 मज साधनाक्रियमाणा | श्री गणेश देवो प्रेरणा || ही गणेश गायत्री जाणा | वाराणसी मंत्राची ||
 
 ग.दि.मा. 

अथर्वशीर्षातला आठवा श्लोक ‘गणेश गायत्री’ असा ओळखला जातो. एकदंताची महती आम्ही जाणतो. वक्रतुंड गणेशाचा ध्यास मला आहे. मी करीत असलेले कार्य करीत असताना श्रीगजानन मला प्रेरणा देत राहो. या ओवीचा शेवट करताना गदिमा असे म्हणतात की हा श्लोक सर्व मंत्रांमध्ये सर्वात पवित्र आहे. याच गणेश गायत्रीला त्यांनी “मंत्रांची वाराणसी” असे संबोधले आहे.

 एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् | रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् || 
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् | रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपूजितम् || 
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् || आविर्भूतं च सृष्ट्यादौ | 
प्रकृते: पुरुषात्परम् || एवं ध्यायति यो नित्यं | स योगीं योगिनां वर: || ९ ||
 चतुर्भुज आणि एकदंत | आयुधे शोभती हस्तांत ||
 पाशांकुश,भग्नदंत | वरद मुद्रा शोभते ||
 मुषकांकित रक्तध्वज | करी मिरवी ज्येष्ठराज ||
 रक्तवर्णी महा-तेज | सा-या देहीं फांकते ||
 लंबोदर हा शूर्पकर्ण | वस्त्रे ल्याला रक्तवर्ण ||
 देही सर्वांगासी रक्त चंदन | मंगलमूर्ती झळकते ||
 रक्तसुमनांच्या मालिका | भक्त वाहती गणनायका ||
 ऐसा विनटतो भक्तसखा | विश्वकर्ता विनायक||
 प्रकृती अथवा पुरुष | यांच्या पैलाड श्रीगणेश ||
 उग्रमूर्ति,उग्रवेष | मंगलकर्ता भक्तांचा ||
 मनाचिया,लोचनांपुढती | ऐसी निर्मूनिया ध्यानमूर्ती ||
 ध्यान करित जे पूजिती | तेच योगी या जगी ||
 
 ग.दि.मा. 

अथर्वशीर्षातला नवव्या श्लोकातल्या पूर्वार्धात गणेशाचे रूप वर्णन केले आहे आणि उत्तरार्धात त्याची स्तुती केली आहे. गदिमांनी रचलेल्या या ओव्या वाचताना क्षणभर गणेशारती वाचल्याचा भास होतो. अतिशय सहज सोप्या शब्दात मंगलमूर्तीचे वर्णन केले आहे. हे आपल्या माहितीचे श्रीगणेशाचे रूप – एक दात, चार हात, हातात पाश व अंकुश, सोंड, आशीर्वाद देणारा हात, उंदीर हे वाहन, लाल रंग, मोठे पोट, सुपासारखे कान, लाल वस्त्रे नेसलेला, लाल रंगाचे गंध लावलेला, लाल फुलांनी ज्याची पूजा केली आहे असे हे श्रीगणेशाचे स्वरूप आहे.

तो भक्तांवर दया करतो, सर्व जगाचे निर्माण त्याने केले आहे, सृष्टीमध्ये प्रकृती व पुरुष त्यानेच निर्माण केले. उग्र व बलाढ्य दिसत असूनसुद्धा भक्तांसाठी तो कायम मंगलमय आहे. त्याचे स्मरण जो नेहेमी करतो, या जगात तोच योगी होऊ शकतो.

 नमो व्रातपतये | नमो गणपतये | नम: प्रमथपतये | नमस्तेSस्तु लंबोदरायैकदंताय |
 विघ्ननाशिने शिवसुताय | श्रीवरदमूर्तये नमो नम: || १० ||
 तपश्चर्यांचा अधिपती | व्रातगणांचा गणपती ||
 अवघे देव ज्या आदरिती | तो म्यां भावें वंदिला ||
 एकदंत हा लंबोदर | शिवशक्तींचा प्रियकुमार ||
 भक्तप्रेमी अभयंकर | नमस्कारिला दंती मी ||
 
 ग.दि.मा. 

हा दहावा श्लोक. यात गणपतीच्या आठ नावांचे स्मरण केले आहे. व्रातपती, गणपती, प्रथमपती, लंबोदर, एकदंत, विघ्ननाशिन, शिवसूत, वरदमूर्ती. यांना पुनः पुनः नमस्कार असो. उपनिषदाने आरंभ करून गणपतीचे आठ नावे घेऊन इथे अथर्वशीर्षाची सांगता होते. इथून पुढे अथर्व ऋषींनी फलश्रुती दिली आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: