बेसावध ड्रायव्हर

२००२ च्या जून महिन्यात माझे लग्न झाले. लग्नापूर्वी मी चारचाकी चालवत नव्हतो. त्यापुर्वी मी कार चालवण्याचा कधी प्रयत्नही केला नव्हता मात्र माझी भावी पत्नी त्यांच्याकडे असलेली मारुती ८०० चालवित असे. एवढेच नव्हे तर तीच्याजवळ चारचाकी चालवण्याचा परवानादेखील होता.

माझी गाडी शिकणे हा एक थरार होता. आजही तो प्रसंग आठवतांना भिती वाटते. तर झालं असं की, व्यवसायानिमित्ता संगणक दुरुस्तीसाठी शहरापासून थोडे दूर असलेले, सुमारे ४० किलोमिटर अंतरावर वज्रेश्र्वरी ह्या ठिकाणी जात असे. त्यापूर्वी मी नेहमी मोटारसायकलवर जात असे. पावसाचे दिवस असल्यामुळे कारने जावे असे ठरले.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत नक्की परत येतो असे सांगून मित्राकडून त्याची कार घेतली. माझी पत्नी मोनाला कार चालवता येत असल्यामुळे माझा ड्रायव्हरचा प्रश्र्न सुटला होता मात्र शहरातून बाहेर पडेपर्यंत गाडीचा वेग अतिशय संथ असा होता. या गतीने वज्रेश्र्वरी गाठायला सायंकाळ झाली असती. एकतर मित्राकडून त्याची कार आणतांना लवकर परत आणतो असा शब्द दिला होता. या विचाराने थोडे चिडूनच मी मोनाला ‘जोरात चालव’ असे सांगत होतो.

माझा चिडलेला चेहरा बघून पत्नीचा संयम सुटत चालला होता. ‘‘मी नुकतीच गाडी शिकलेली आहे त्यामुळे मला यापेक्षा जोरात चालवता येणार नाही’’ शहराबाहेर गाडी थांबवून तिने गौप्यस्फोट केला. याचवेळी वज्रेश्र्वरी येथील कंपनीतून लवकर येण्यासंबंधी सारखे फोन येऊ लागले आणि माझा संयम सुटत चालला.

काहीही झाले तरी उशीर होणारच होता त्यामुळे मी स्वतःच गाडी चालवण्याचे ठरवले. पत्नीला शेजारी बसवून मी ड्रायव्हर सिटवर बसलो आणि माझे प्रशिक्षण सुरु झाले. कोपायलटच्या सुचनांचा संतत भडिमार सुरु झाला. शहराच्या बाहेर पडल्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावरून माझी गाडी धक्के खात चालु लागली होती. असंख्य आचके देत महामार्गावरून जाणार्‍या इतर वाहनांचे लक्ष वेधून घेत होती. त्यादिवशी महामार्गावरील इतर वाहनचालकांनी नक्कीच मला शिव्यांची लाखोली वाहीली असणार.

गाडी चालवायला शिकण्याची याहून वेगळी काय पद्धत असते असा प्रश्र्न मला पडला. एकतर नवशिका ड्रायव्हर सुरुवातीला बेसावध (unconscious) असतो त्यात अज्ञानाची (Ignorance) भर असते. गाडी शिकतांना सुरुवातीला तो अधिकच जाणीवपूर्वक (conscious) चालवण्याचा प्रयत्न करतो, अधीक काळजीपूर्वक चालवण्याच्या नादात त्याच्याकडून अधिकच चुका घडू लागतात, यावेळीदेखील तो अज्ञानी असतोच. अज्ञानाचे हे मळभ हळूहळ दूर होऊ लागते आणि गाडी चालवण्याचे ज्ञान त्याला येऊ लागते. माझही त्यादिवशी असंच काहीतरी झाले असावे. दूपारी दोन वाजता मी इच्छित स्थळी पोहचवून काम संपवले आणि सायंकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Maharashtra Times 11 Dec, 2012

देवाने बहुदा त्याच दिवशी माझी ड्रायव्हींगची परिक्षा घ्यायची ठरवले होते. महामार्गावरून येत असतांना मधल्या घाटात अभूतपूर्व अश्या वादळी पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली. काही समजण्याच्या आतच रंगमंचावर प्रकाशयोजना बदलावी तशी आकाशात ढगांनी गर्दी केली. विजा कडकडू लागल्या. गाडीचा हेडलाईट कसा लावावा, पार्कींग लाईट कसे लावावेत यासंबंधी माझी को-पायलट मला भराभर सूचना देऊ लागली.

‘‘या पावसात अन.. असल्या अंधारात, घाटातून मला गाडी चालवता आली नसती’’ हे को-पायलटचे मनस्वी उद्गार माझी काळजी अधिकच वाढवित होती. सकाळी हिम्मत करून थोडीफार गाडी शिकून घेतल्याने, हळूहळू का असेना, परतीचा प्रवास आम्ही करू शकत होतो. अन्यथा प्रलयंकारी पावसात महामार्गावर गाडी वळचणीला लावून रात्र तिथेच काढावी लागली असती.

पावसामुळे बाहेरचे काहीच दिसत नव्हते, फक्त समोरून येणार्‍या वाहनांच्या प्रकाशात अथवा विजांच्या प्रकाशात समोरची वाट काही काळ लख्ख दिसत होती. घाटातून येत असतांना पोटात भितीचा गोळा आला होता. मित्राला गाडी वेळेत देण्याचे दडपण मनावर आले होते. घाट संपतांनाच माझ्या त्या मित्राचे फोन देखील सुरु झाले होते. ही सगळी कसरत करीत साडेआठच्या सुमारास मी मित्राकडे पोहोचलो. तो काळजीने आमची वाट पहात होता. सगळी गाडी बाहेरून चिखलाने माखली होती. गाडीच्या आत सहज मित्राची नजर गेली तेव्हा तर तो थक्क झाला. काचेवर आतून बाष्फ जमा झाल्यामुळे बाहेरचे काहीही दिसत नव्हते.

काचेवर एवढे बाष्फ असतांना तु गाडी कशी चालवत होता? हा प्रश्र्न तो मला सारखा सारखा विचारत होता. एसी का नाही सुरु केला? एसी सुरु केला असता तर काचा स्वच्छ झाल्या असत्या. असे बरेच काही तो मला सांगत होता. त्यातले मला काहीएक कळत नव्हते. त्याक्षणी दिवसभराचा तो थरार मनोमन अनुभवत होतो.

त्यादिवशी बेसावध आणि अज्ञानी अवस्थेतून सावध आणि ज्ञानी अवस्थेत येत मी गाडी चालवायला शिकलो मात्र तो थरार मी कधीही विसरू शकणार नाही. सावध आणि ज्ञानी झाल्यानंतर गाडी चालवण्यासाठी काही आवश्यक असेल तर तो ‘आत्मविश्र्वास’. आता देशभरात अनेक ठिकाणी दूरपर्यंत सहजपणे गाडी चालवत ड्रायव्हींगचा आनंद घेत असतो.

तरीदेखील, कधी कधी मला वाटते की मी पुनः बेसावध झालो आहे. गाडी चालवतांना असंख्य विचार डोक्यामधे सुरु असतात. मधेच फोन वाजतो तर कधी स्क्रीनवर आलेले मेसेजचे नोटीफीकेशन लक्ष वेधून घेते. अशावेळी जोरात शेजारून गाडी जाते किंवा कोणीतरी कट मारून पुढे जातो. तेव्हा मी पुन्हा एकदा सावध होतो. मग मला आठवते ती सायंकाळ… आणि कानात आवाज येतो, ‘‘गड्या सावध रहा’’

पूर्वप्रसिद्धी – महाराष्ट्र टाईम्स, ११ डिसेंबर २०१२

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: