संभवामी युगे युगे

लॉकडाऊन. या एका दिवसात सर्व जग स्तब्ध झाले. आवाजांचे प्रदुषण थांबले. शहरात राहणार्‍यांना ‘रिसोर्ट’चा फील आला. एका निश्र्चल शांततेचा अनुभव सर्वजण घेऊ लागले. इतकी वर्षे झाडांवर राहणार्‍या पक्षांचा चिवचिवाट उत्कटपणे ऐकू येऊ लागला. 

समुद्रातून प्रवास करणारी प्रवासी वाहने जवळच्या धक्क्याला नांगर टाकून स्थिरावली.

जगभरातील विविध मार्गाने होणारे प्रवास थांबले. देशांतर्गत प्रवास अचानकपणे थांबवण्यात आले. रस्तेमार्ग, जलमार्ग, हवाईमार्ग सर्वकाही थांबले. समुद्रातून प्रवास करणारी प्रवासी वाहने जवळच्या धक्क्याला नांगर टाकून स्थिरावली. केवळ एका आठवड्यात या सगळ्या घडामोडी झाल्या आणि आश्र्चर्यकारकपणे जगभरातील वातावरणातले प्रदूषण ६०% हून कमी झाले. 

अशाच एका सकाळी पंजाबमधल्या जालंधर गावातील घरांच्या गच्च्यांवर लोक गोळा होऊ लागली. उत्तरेकडील क्षितीजावर कधीही दिसून न येणारे २०० किमी दूर असलेली हिमालयातील शिखरे साध्या डोळ्यांनी दिसू लागली. काही क्षणांमधे ही बातमी प्रकाशाच्या वेगाने ‘वायरल’ झाली. जालंधरमधे सत्तरीला टेकलेली माणसे ‘हिमशिखरांच्या’ नुसत्या आठवणीने गहिवरली. कोरोना या साथरोगामुळे सक्तीने लागलेल्या ‘लॉकडाऊन’ नंतर केवळ पाचच दिवसांत पन्नास वर्ष साचलेली प्रदूषणाची काजळी स्वच्छ झाली. लख्ख दिसू लागले.

हिमालयातील शिखरे साध्या डोळ्यांनी दिसू लागली.

वातावरणातले हे बदल केवळ दिसण्यापूरते मर्यादित नव्हते. रस्ते निर्मनुष्य झाले तसेच समुद्र किनारे देखील ओसाड पडले. याच काळात नदीच्या पाण्यातील ॲाक्सिजनची पातळी झपाट्याने वाढली. मानवी संचार मर्यादित झाल्यामुळे पाण्यात साचणारा कचरा आपोआप कमी झाला.  वसुंधरेवर राहणार्‍या यच्चयावत जीवांच्या अस्तित्वावर याचा परिणाम होत होता. आपण मनुष्य सोडून पृथ्वीवरील इतर जीवांच्या दृष्टीने हे वर्ष फार आशादायी ठरले असणार यात शंकाच नाही. 

निर्मनुष्य झालेली समुद्र किनार्‍यावरची ही शांतता विष्णुच्या प्रथमावताराला समुद्रात साद घालत होती. महाकाय बोटींनी किनार्‍यावर नांगर टाकल्यानंतर समुद्रातील पाण्यामधले ध्वनीप्रदूषण अचानकच कमी झाले होते. सुदूर सागरामधील व्हेलच्या गेल्या पिढीने कधीही अनुभवली नसेल अशी अथांग शांतता ते आता अनुभवत होते. गेल्या काही दशकांपासून काळजीपोटी आपल्या पिलांना कायम सोबतीला ठेवणार्‍या या मत्स्यमाता या शांततेनंतर पिलांना मुक्तपणे दूरवर खेळू देत होत्या. समुद्री कोलाहल कमी झाल्यामुळे ‘हाकेचे’ अंतर वाढले होते आणि त्यामुळेच या मातांची काळजी थोडी कमी झाली होती. तिकडे न्युझिलंडमध्ये शास्त्रज्ञांना डॉल्फीन एकमेकांशी शांतपणे बोलतांना आढळून आली. पूर्वी समुद्रातील ध्वनीप्रदूषणामुळे एकमेकांशी बोलतांना त्यांना उच्चारव करावा लागत असे.

विष्णुचा ‘द्वितीयावतार’ कुर्म. गेली कित्येक वर्षे या कासव माता किनार्‍यावर गर्दी बघूनच बहुदा प्रजननाला यायचे टाळत होत्या. लॉकडाऊन लागल्यानंतर निर्मनुष्य किनार्‍यावर त्यांची लगबग वाढू लागली. या एका अविस्मरणीय वर्षाने त्यांची संख्या वाढण्याचे सुवर्तमान महाजालावर ‘वायरल’ होऊ लागले.

पाण्यातील ही अथांग शांतता पाण्याखाली असलेल्या जीवांसाठी मनोरंजक ठरली असणार. या निमित्ताने त्यांनी देखील पाण्याखाली दूरचे प्रवास आखले असणार. पाण्याखालच्या माश्यांच्या पिलांनी आपआपल्या मातापित्यांकडे फिरायला जाण्याचा हट्ट धरला असणार. त्यांच्या आई बाबांनी हा हट्ट नक्की पुरवला असणार..

तिकडे दक्षिण आफ्रिकेतील पेंग्वीनमाता केवळ रात्री समुद्रात शिकारीसाठी जात होत्या. दिवसा त्यांच्या पिलांना भूक लागत असे, परंतू किनार्‍यावर प्रवासी माणसांची गर्दी बघून पिलांना एकटे सोडून अन्न आणण्याचे धाडस त्या करीत नव्हत्या. लॉकडाऊननंतर ही परिस्थीती बदलल्याची दिसून येते आहे. निर्मनुष्य किनारा असल्यामुळे निर्धास्तपणे दिवसा शिकार करून दिवसातून तीन ते चारदा पिलांची भूक भागवतांना त्या दिसून येत आहेत. 

प्राणी जीवनाच्या दृष्टीने ही शांतता अनेक अर्थाने उपकारक अशीच ठरली असणार यात शंका नाही. मात्र सप्तश्रृंग गडावर अथवा त्र्यंबकेश्र्वरी ब्रह्मगिरीवर मुक्कामी असलेल्या माकडांची परिस्थिती काहीशी वेगळी असावी. अनेक दशकांपासून प्रवाशांच्या बॅगा पळवून त्यातला खाऊ लंपास करणारी माकडे, गेल्या वर्षभरात हवालदिल झाली असणार. मानवी प्रवास थबकल्यामुळे चिक्क्या, शेंगदाणे, मुरमुरे खाण्यासाठी चटावलेल्या या मंडळींना त्यांच्यातील वडीलधार्‍यांनी पुन्हा एकदा कान धरून ‘कडु’ पाला आणि ‘तुरटगोड’ फळे खायला शिकवली असणार. तोंड वेंगाडून का असेना परंतू भुक लागल्यामुळे त्यांनी ती खाल्ली असणार. मात्र पुनः माणसांचे पाय या प्रदेशाकडे वळतील तेव्हा हे प्राणी परत पूर्वीसारखे वागतील का? प्राण्यांच्या वर्तणूकीवर गेल्या वर्षभरात खूप बदल झाल्याचे दिसून येत आहे. प्राण्यांना त्यांचा हा स्वच्छंद आवडू लागला आहे. माणसांचा वावर कमी झाल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संचाराचे क्षेत्र वाढले आहे. येणार्‍या काळात वनप्रदेशातून प्रवास करतांना वन्य पशु पक्ष्यांच्या संचारावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागेल असे या क्षेत्रातील जाणकार आता सांगू लागले आहेत. 

मोबाईल मधे साधे ॲप टाकतांना प्रायवसी सेटींग तपासून बघणारे आपण सर्वजण आपल्या क्षणभराच्या मनोरंजनासाठी स्वार्थी झालो आहोत. हेच खरे. एखादा बिबट्या अथवा वाघ शिकार करून आणल्यानंतर ती खाण्यासाठी आपल्या पिलांना हलक्या आवाजात ‘कॉल’ देत असेल तर माणसांच्या या कोलाहलात तो त्या बछड्यांना ऐकू जात असेल का ? या झाडावरचा राघू त्या दूर पलिकडच्या झाडावर बसलेल्या मैनेला शीळ घालत असेल. ती शीळ तीला ऐकू जाईल का? असा विचार करायला आपण विसरलो आहोत. 

जंगलांमध्ये श्र्वापदे पाहण्यासाठी जातांना कोलाहल कमी करता येईल का? त्यांना नको असलेला कॅमेरांचा ‘लखलखाट’ अथवा ‘क्लिकक्लिकाट’ थांबवता येईल का? जंगली श्र्वापदांना शिकार करतांना पहाण्याचा अट्टाहास कशासाठी? त्यासाठी गाईडला भरीस पाडून त्यांच्या एकांतात आपण जायलाच हवे का? आपल्या या अशा वागण्याचा त्या प्राण्यांच्या प्रायवसीवर काही परिणाम होतो आहे का? या मुलभूत प्रश्र्नांचा विचार सर्वांनी करायची आवश्यकता आहे.

हे माझे, हे तुझे असा विचार न करता सबंध पृथ्वी माझे कुटूंब आहे हा उपनिषदातला ‘वसुधैव कुटूंबकम्’ हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. या वसुधेवर राहणारा प्रत्येक जीव हा माझ्या कुटूंबाचा भाग आहे हाच विचार आपल्या सनातन धर्मामध्ये जागोजागी असल्याचा आढळून येतो. 

‘धारयती इति धर्मः’ अशी धर्माची व्याख्या आहे. याचा अर्थ – जे धारण केलेले आहे ते म्हणजेच ‘धर्म’ (Domain). या न्यायाने पृथ्वीवर रहाणारे असंख्य जीव हाच पृथ्वीचा ‘धर्म’ होय. धर्म संस्थापनेचे हे कार्य अविरत सुरु राहण्यासाठी तो जगनियंता वेळोवेळी प्रत्येक युगात निरनिराळ्या अवतारात प्रगट होत राहणार. ‘धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’

  • श्रीनिवास गर्गे

Loading

%d bloggers like this: