मिथ्या ते ‘मेटा’

‘सेकंड लाईफ’ नावाचा एक आभासी खेळ संगणकावर आहे. आपल्याकडे फार कमी लोकांना हा गेम माहिती असेल. फिलीप रोझेडेलने या स्टिम्युलेटीव्ह खेळाची सुरुवात वायटूकेच्या पूर्वीच म्हणजे खरंतर १९९९ मध्ये केली. ‘लिंडन लॅब’ हे यांचे मुख्य कार्यालय सॅन फ्रॅन्सिस्को येथे आहे आणि यांची इतर अनेक सॅटेलाईट कार्यालये अमेरीकेत आहेत. 

हा कॉम्प्युटर गेम नसून हे एक ‘आभासी जग’ आहे असे याचे वर्णन निर्माते फिलीप रोझेडेल करतात. आपल्या जगण्याचे हे एकप्रकारे स्टिम्युलेशन आहे. स्क्रिनवर एका मानवी आकृतीपासून या जगाची सुरुवात होते. या मानवी आकृतीला आवडेल असे कपडे आपण निवडतो. त्या आकृतीचे लिंग, रंग, केशरचना, चालण्याची पद्धत (गेश्र्चर), हावभाव याची निवड केल्यानंतर हा तुमचा ‘अवतार’ म्हणून आभासी जगात अवतीर्ण होतो. या अनोख्या जगाचा स्वतंत्र असा नकाशा या निर्मात्यांनी तयार केलेला आहे. सहभागी येथे जागा विकत घेऊन त्यावर ग्राफीक्सच्या सहाय्याने त्रिमितीय वास्तू तयार करतात. ग्राफीक्स व प्रोग्रामिंग लॅन्ग्वेजच्या सहाय्याने अनेक सुंदर समुद्रकिनारे, हॉटेल्स, खेळगृहे, रिसर्च सेंटर्स, रेडीयो स्टेशन्स, कॅसिनो, रेल्वे स्टेशन, दुकाने, रस्ते येथे तयार केली गेली आहेत. एवढेच नव्हे तर मंदिरे, चर्चेस व प्रार्थनास्थळे देखील येथे तयार केली गेली आहेत. 

आपल्यासारखीच इतर सहभागी या आभासी जगाशी जोडली गेली आहेत. सात कोटीहून अधीक सहभागींनी यात नोंदणी केली आहे. २७००० हून अधिक नयनरम्य प्रदेश त्रिमितीमध्ये यात तयार केले गेले आहेत.  विशेष म्हणजे या जगात पैसा देखील आहे. ‘लिंडन डॉलर’ हे चलन इथे वापरले जाते. पैसे कमवण्यासाठी सहभागी येथे व्यवसाय करू शकतात. उदाहरणार्थ प्रोग्रामींग लॅंग्वेजच्या सहाय्याने या जगात वापरता येण्याजोगे फॅशनेबल कपडे बनविण्याचा व्यवसाय तुम्ही करु शकता. दूसरा सहभागी हे कपडे विकण्यासाठी उत्कृष्ट इंटेरीयरचे शॉप तयार करून ते भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरु करतो. तिसरा सहभागी दूकानात सेल्समन म्हणून काम करतो. कमावलेल्या या पैश्यातून येथे आभासी घर, दुकान अथवा मालमत्ता घेता येते. या पद्धतीने एक संपूर्ण आभासी इकोसिस्टम या खेळात तयार केली गेली आहे. अर्थातच हे व्यवहार सांभाळण्यासाठी बॅंका, पतपेढ्या इ. ओघाने आले. ते देखील येथे आहे. कमावलेले ‘लिंडन डॉलर्स’ खर्‍याखुर्‍या डॉलर्समध्ये रुपांतरीत करण्यासाठी आवश्यक देवाणघेवाण (Exchanges) केंद्रे येथे स्थापन करण्यात आली आहेत.

फिलीप रोझेडेल (अवतार) / लिंडन लॅब

मानवी भावनांचा कल ओळखून या आभासी जगात विविध अनुभव घेता येतात हे या सेकंड लाईफ निर्मात्याने फार पूर्वीच ओळखले होते.

नदीकिनारी मित्राबरोबर फिरण्याच्या अनुभवापासून ते समुद्रात सर्फिंग करण्यापर्यंत आणि सकाळी समुद्रकिनार्‍यावर सूर्यस्नान ते सायंकाळी मावळतीच्या सुर्याला साक्षी ठेऊन निवांत एखाद्या पबमध्ये सांद्र मधूर संगीत ऐकण्याचा अनुभव यामधे घेता येतो. प्रार्थनास्थळावर ध्यानसाधना केल्यानंतर कॅसिनोमध्ये पैसे डावावर लावून नशिबाला कौल लावता येतो. 

प्रारंभीच्या काळात (२००३ मध्ये) आपल्यासारखे सहभागी आजूबाजूला असतांना त्यांच्याशी टेक्स्ट चॅटींगद्वारे संवाद साधता येत असे. २००६ नंतर इंटरनेटचा स्पिड जसजसा वाढू लागला तसे येथे व्हॉईसचॅटींग द्वारे संवाद साधता येऊ लागला. मॉलमध्ये माणसांची गर्दी असल्यास त्या गर्दीत शिरल्यानंतर ती माणसे एकमेकांशी काय बोलत आहेत हे देखील स्टेरीयोफोनीक ऐकू येते, मधेच त्यांची बोलण्याची सुत्रे धरून आपल्यालाही त्या चर्चांमध्ये सहभागी होता येते. यामुळे या आभासी जगात गटचर्चा रंगु लागल्या. नविन मित्रमैत्रिणी येथे जमू लागल्या. अर्थातच भिन्नलिंगी व्यक्तींना येथे मोकळेपणाने बोलण्याची मोकळीक मिळू लागली. खर्‍या आयुष्यातली दुःख विसरून हे आभासी सुख मिळवण्यासाठी सहभागींची संख्या या काळात वाढू लागली. याच काळात या आभासी जगात स्वतंत्र अशी ‘कामसृष्टी’ देखील निर्माण झाली. कामुक ‘अवतार’ या आभासी जगाचा एक अविभाज्य भाग झाला त्यातून अनेक सेक्स कम्युन्स येथे निर्माण करण्यात आले आहे. असो. 

या आभासी जगात तुम्हाला उडता येते, पक्ष्याच्या नजरेने परिसर न्याहाळता येतो. नवीन प्रदेशात क्षणभरात टेलीपोर्ट (अवतिर्ण) होता येते. आपल्या लोकेशनचा मेसेज पाठवण्याची अभिनव कल्पना ‘सेकंड लाईफ’ मध्ये २००३ मध्ये म्हणजेच व्हॉटसअप येण्यापूर्वीच येथे वापरली जात होती हे विशेष. या खेळात मित्राने लोकेशन पाठवल्यानंतर Teleport वर क्लिक केल्यावर क्षणभरात त्याच्यासमोर अवतीर्ण होता येते. 1960 च्या दशकात गाजलेली रहस्य विज्ञान कथा ‘स्टार ट्रेक’ अनेकांनी बघीतली असेल त्यात ज्याप्रमाणे एकाठिकाणी अदृश्य होऊन दुसर्‍या ठिकाणी अवतिर्ण होता येते तसेच क्षणभरात सेकंड लाईफ मधील नकाशांमध्ये हवे तेथे अवतिर्ण होता येते. 

मार्क झुकेरबर्ग (अवतार) / फेसबूक-मेटा

खरतर हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे मार्क झुकेरबर्गने (झुक्याने) मागच्या वर्षी २०२१ मध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉटसअपचा विलय करण्याची केलेली घोषणा. या नविन विलयाला त्याने नांव दिलय ‘मेटा’. 

मेटा म्हणजे काय? असा प्रश्र्न साहजिकच सर्वांना पडला आहे. मेटा म्हणजे मेटाव्हर्स. नील स्टीफनसन नावाच्या लेखकाने १९९२ मध्ये ‘स्नो क्रॅश’ नावाची कादंबरी लिहीली. ‘मेटाव्हर्स’ आणि ‘अवतार’ हे दोन्ही शब्द प्रथम या कादंबरीत या लेखकाने वापरले असा दावा केला जातो. त्याही आधी ग्रीक भाषेत ‘मेटा’ (from the Greek μετά, meta, meaning “after” or “beyond”) हा शब्द ‘पलीकडे’ या अर्थाने वापरात होता. २०१० मध्ये आलेला ‘इनसेप्शन’ हा हॉलिवूड चित्रपट ‘मेटाव्हर्स’ वर आधारित होता.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डेटाचा वापर करून तयार करण्यात आलेले एक नवीन आभासी विश्र्व म्हणजेच ‘मेटा’. या नवीन आभासी विश्र्वाचे आपण येणार्‍या काळात कायमचे रहिवासी होणार आहोत, नव्हे झालो आहोत. या आभासाला वगळून आपले अस्तित्व आजच शून्य झाल्याचे आपल्या लक्षात येईल. 

मार्क झुकेरबर्गच्या या महत्वाकांक्षी मेटाव्हर्स मध्ये काय असू शकेल याचा पूर्वार्ध मी लेखाच्या सुरुवातीलाच ‘सेकंड लाईफ’ या खेळातून सांगितला आहे. तरीदेखील नवीन शक्यतांची यादी फार मोठी आहे. (वेळ असला तर लेखासोबत दिलेला मार्क झुकेरबर्गने वर्णन केलेला हा व्हिडिओ नक्की पहा) 

सहजपणे होणारे व्हिडिओ कॉलिंग हे येणार्‍या काळात येऊ घातलेल्या टेलिपोर्ट टेक्नॉलाजीचे पहिले पाऊल आहे. व्हॉटसअप वर ग्रुपने गप्पा मारण्यासाठी केलेली ग्रुप कॉलिंग येणार्‍या काळात ‘मेटा’ च्या या नविन आभासी जगात घडणार आहे. व्यावसायीक चर्चांसाठी होणारे झूम कॉल येणार्‍या काळात अशाच आभासी जगात होणार आहेत. गेल्या दशकभरात टिव्हीवर दाखवण्यात आलेल्या अनेक मुलाखती आभासी वातावरणात होत असतात याची आपल्याला जाणीव देखील नसते. मुंबईमधील चॅनलच्या न्यूजरूम स्टुडिओमधून घेतली जाणारी मुलाखत टीव्हीवर बघत असतांना आपल्याला जाणवणार देखील नाही की मुलाखत देणारी व्यक्ती सुदूर प्रदेशातून देत आहे. स्टुडिओत सामोरे बसून बोलतांनाची आभासी प्रतिमा टीव्हीवर दिसत असते.

सेकंड लाईफ मधील आभासी वर्ग

कोविडनंतर यातला काही भाग नकळत आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. शाळांमधील वर्ग गेली दोन वर्षे व्हिडिओ कॉलिंगवर, लॅपटॉपच्या छोट्याशा खिडकीमधून भरत होते. येणार्‍या काळात कॉम्प्युटर / मोबाईलच्या छोट्या द्विमितीय स्क्रिन जाऊन त्यासाठी त्रिमितीय उपकरणे (उदा. 3D चश्मे, Virtual Reality Headset) येऊ घातले आहेत. “COURSERA” सारख्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण देणार्‍या संस्था जुन्या शिक्षणपद्धती बदलून नवीन कात टाकतील अशी आशा आहे. भारतात आयआयटी, रुडकी यांनी ‘कोर्सेरा’चे व्यासपीठ वापरून नवनवीन अभ्यासक्रम सुरु केले आहेत. TCS आणि Infosys सारख्या संस्थांनी प्रशिक्षणाच्या या नवीन पद्धतींवर काम करायला सुरुवात केली आहे. या सर्वांसाठी हे आभासी जग उपयुक्त ठरणार आहे.

नवीन शक्यतांची यादी फारच मोठी आहे. तरीदेखील दूरस्थ वैद्यकीय उपचार करण्यासाठी या त्रिमितीय 3D तंत्रज्ञानाचा आधार फार आवश्यक ठरणार आहे. बकेट लिस्टमधली पर्यटनस्थळे फिरण्यासाठी या त्रिमितीय मेटाव्हर्सचा वापर येऊ घातला आहे. प्रसिद्ध व्यक्तींना सभेतून एकावेळेस अनेक ठिकाणी संवाद साधण्यासाठी होलोग्राफिक इमेजेसचा वापर केला जातो आहे हे गेल्या निवडणूकीत आपण पाहिलेच आहे . त्रिमितीय तंत्रज्ञानाने असे ‘मेटा’ संवाद शक्यतेच्या टप्यात आलेले आता दिसते आहे.  

नील स्टीफनसन (अवतार) / लेखकः स्नो क्रॅश

विज्ञानकथा लिहीणारा नील स्टीफनसन अमेरीकन असून ते स्वतः इंजिनयर आहेत. ऐतिहासीक कल्पकथा, सायबरकथा या विषयांवर त्यांची पुस्तके आंतरराष्ट्रीय बाजारात गाजलेली आहेत.

‘स्नो क्रॅश’ या नील स्टीफनसन लिखित कादंबरीमधे ‘मेटाव्हर्स’ आणि ‘अवतार’ या शब्दांचा उल्लेख वाचला तेव्हाच आद्य शंकराचार्यांची आठवण आली. आपल्याकडे हजारो वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी अद्वैतवादाचा पुरस्कार करत भारतभर भ्रमंती केली. हे करत असतांना ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्‍या’ हे तत्त्वज्ञान मांडले. यातील ‘मेटा’ आणि ‘मिथ्या’ शब्दामधील अर्थसाधर्म्य बघून अचंबित झालो.  हे संपूर्ण विश्र्व माणसाला पडणार्‍या स्वप्नासारखे अवास्तविक आहे तरीदेखील ‘स्वप्न’ हे देखील आपल्याच बुद्धिची निर्मिती नाही का?

ब्रह्म हेच सत्य असून जग हे मिथ्या आहे. ब्रह्म म्हणजेच ज्ञान आणि ज्ञान हेच जीवनाचे इप्सित असे तत्त्वज्ञान मांडतांना जग हे मिथ्या म्हणजेच आभास असून केवळ ज्ञानाची उपासना करावी हेच सूत्र या श्र्लोकाच्या (Verse) माध्यमातून आद्य शंकराचार्यांनी सर्वांना सांगीतले. ‘मेटा’ च्या या नवीन जगात ‘मिथ्या’ हा आभास असून येणार्‍या पिढीने आभासात न गुंतता उत्कर्षाची/ज्ञानाची कास धरायला हवी. नाही का?

(ह्या पोस्टमधील शब्दांकन श्रीनिवास गर्गे यांचे आहे. छायाचित्रे secondlife.com, corsera.org, isha.org या व इतर वेबसाईटवरून साभार. कृपया copy/paste वा पुन:र्निर्देशीत करतांना सर्वांचा उल्लेख आवश्यक)

२००३ पासून लेखक या आभासी जगाचा रहिवासी आहे. (Ping me: Pluto Clary)

© https://www.aispais.com

Loading

3 Replies to “मिथ्या ते ‘मेटा’”

  1. खूपच सुंदर पणे विचार मांडले आहेत तू . येणाऱ्या काळात घरात बसून जग भ्रमण आणि माणसांच्या भेटी करणाऱ्या ह्या संस्कृती चा फायदा जास्त आणि नुकसान कमी झालं म्हणजे पावलं. नाहीतर लोकांना घरातून बाहेर काढणं अवघड होणार आहे.

  2. लेख अतिशय सुंदर आहे. अभ्यास करणे आणि ज्ञान प्राप्त करणे यातला फरक जरी कळला तरी नवीन पिढीला मार्गदर्शन मिळेल.

  3. लेख वाचल्यानंतर लक्षात आले कि या आभासी युगाची सुरुवात खुप पूर्वीच झाली आहे खुप सुंदर लिखाण आहे सर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: