इदम् न मम

काही दिवसांपूर्वी एचबीओ या चॅनलवर चेर्नोबील दुर्घटनेवर आधारित माहितीपट बघण्यात आला. हि भयंकर दुर्घटना तत्कालिन अखंड रशियामध्ये घडली होती. येथे असलेल्या अणुभट्टीने १९८६ साली झालेल्या स्फोटाने सबंध जगाला हादरा दिला होता. दूसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस जपानमध्ये हिरोशिमा व नागासाकी या शहरात अमेरिकने घडवून आणलेल्या अणुस्फोटापेक्षा किंवा जपानमध्ये फुकूशिमा या अणुभट्टीत भुकंपामुळे झालेल्या किरणोत्सर्ग गळतीपेक्षा अनेकपट अधिक किरणोत्सर्ग या अपघातामुळे निर्माण झाला होता. विशेष म्हणजे साम्यवादी असलेल्या या देशाने या घटनेची हवी तेवढी गंभीर दखल घेतली नाही असा आरोप जगभरातून आजही करण्यात येतो. सुमारे तीन ते चार लाख लोक या प्रदेशातून तातडीने विस्थापीत करण्यात आले. हा प्रदेश कायमस्वरुपी निर्मनुष्य करण्यात आला. मृतांचा सरकारी आकडा ५० असला तरी ४००० पेक्षा जास्त लोक या अपघातात मरण पावल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. 

या प्रदेशाच्या पूर्व इतिहासाकडे बघितल्यास लक्षात येईल की, विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत युक्रेन आणि बेलारूस या प्रदेशाच्या सिमाभागात असलेल्या पिप्रियात नदीच्या दोन्ही तटांवर समृद्ध असे जंगल होते. याच काळात काच व व्होडका कारखान्यांना लागणार्‍या अपरिमित इंधनासाठी या जंगलातली झाडे तोडली गेली. कालांतराने या भागातील जंगले नष्ट पावली. अपरिहार्यपणे हे कारखाने इंधनाच्या शोधासाठी इतरत्र हलवण्यात आले. या नदीच्या पात्रावर दुतर्फा पसरलेल्या या उजाड परिसरात १९७० च्या दशकात ‘चेर्नोबील’ ही अणुभट्टी रशियाने निर्माण केली होती. दुर्दैवाने १९८६ साली याच अणुभट्टीच्या चार नंबरच्या केंद्रावर हा स्फोट झाला. हा खूपच मोठा अपघात होता.  याचे गांभीर्य कळायला सुमारे दोन दशके जावी लागली.

या स्फोटामुळे किरणोत्सर्गाची गळती होऊ लागली. या भागातले जीवन थांबल्यासारखे झाले. अनेक वनस्पती व प्राणी या दुर्घटनेत मरण पावले. जे जगले अथवा वाचले त्यांना किरणोत्सारामुळे अपुरे व रोगट जीवन वाट्याला आले. या स्फोटानंतर सुमारे पाच लाख वर्ग किलोमिटरचा हा प्रदेश अक्षरशः निर्मनुष्य करण्यात आला. गळती लागलेली अणुभट्टी महत्‍प्रयासाने सिमेंटने झाकण्यात आली. परंतु हे पुरेसे नव्हते. येथे होणारा किरणोत्सर्गाचा आवाका बघता शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. हे स्थळ सुरक्षित व्हावे याकरीता आंतरराष्ट्रीय समुदायाने या अणुभट्टीवर सुरक्षा कवच बसवण्याचे आवाहन केले होते. नुकतेच २०१२ साली १०० मिटर उंच असलेला सर्वात मोठा स्टिलचा डोम त्यावर झाकण म्हणून बसवण्यात आला. या झाकणामुळे येणारी किमान १०० वर्षे किरणोत्सारापासून मानवजातीचा बचाव होईल अशी आशा आहे. हा प्रदेश अजूनही २०००० (वीस हजार) वर्षे मानवासाठी असाच असुरक्षित असणार आहे. यावरून या घटनेची गंभीरता लक्षात येईल.

1986 साली चेर्नोबील मधे नेमके काय झाले?

स्फोटामुळे पसरलेला (आयोडीन) आय/१३१ सारखा किरणोत्सार थायरॉईड, कर्करोग, मोतिबिंदू यासारख्या अनेक व्याधींना आमंत्रण देतो. जर्मनी व युरोप यासारख्या येथून जवळ असलेल्या देशांमध्ये डोळ्यांशी निगडीत असलेल्या दूर्मीळ कर्करोगग्रस्तांची संख्या या स्फोटानंतर वाढल्याची दिसून आली आहे. या परिसरात असलेल्या जंगलामधील झाडांवर याचा सर्वात वाईट प्रभाव पडल्याचे दिसून आले. इथली झाडे लाल झाली व मेली. या जंगलाला यानंतरच ‘रेड फॉरेस्ट’ असे म्हटले जाते. येथील पशुपक्ष्यांमध्ये अनुवंशीक असे असामान्य व विकृत्तीयुक्त बदल होऊ घातले आहेत. सुदैवाने आय/१३१ चा किरणोत्सार जास्त काळ वातावरणात रहात नाही.

असे असले तरी, गेल्या दशकापूर्वी हे सर्व नकारात्मक घडत असतांना शास्त्रज्ञांना येथे नवी आशा दिसू लागली आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात या जंगलात एडका, हरीण, रानडुक्कर यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या जंगलातली जीवविविधता स्फोटानंतरच्या दशकात हळूहळू कमी झाली होती. झाडांवर पक्षी येईनासे झाले होते, तेथे आता काही भागांत पक्ष्यांचे थवे दिसू लागले आहेत. नामशेष होत जाणार्‍या रशीयन जंगली घोड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. लांडगे, जंगली कुत्री, तपकिरी अस्वले आणि बायसन या सारख्या प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येते आहे. गेली ३५ वर्षे हा परिसर निर्मनुष्य असल्यामुळेच या जंगलातली जैवविविधता विकसीत झाली आहे हे नाकारून चालणार नाही. 

गेली ३५ वर्षे हा परिसर निर्मनुष्य असल्यामुळेच या जंगलातली जैवविविधता विकसीत झाली आहे हे नाकारून चालणार नाही.  -श्रीनिवास गर्गे

या अणुभट्टीसाठी लागणारी मानवी वसाहत युक्रेनच्या उत्तरेला असलेल्या पिप्रियात नदीकाठी वसवण्यात आली होती. पन्नास हजार लोकवस्तीच्या मानाने हे शहर त्याकाळी अत्यंत आधुनिक असे होते. हॉस्पिटल, शाळा, सिनेमागृहे, शॅापिंगमॉल, आंतरराष्ट्रीय मानांकने असलेली खेळगृहे, तरणतलाव व आजच्या काळात शोभतील असे सर्व काही होते. या दुर्घटनेनंतर सर्व काही बदलले. ४८ तासांत हे संपूर्ण शहर निर्मनुष्य करण्यात आले. किरणोत्साराच्या भितीने घरातल्या सर्व वस्तु तशाच सोडून लोकांनी पलायन केले. 

आज हे शहर ‘भुतांचे शहर’ म्हणून ओळखले जाते. निर्मनुष्य झाल्यानंतर या शहराचे रुपांतर आता जंगलात झाले आहे. मनुष्याचा हस्तक्षेप नसल्यामुळे या शहरातील रिकाम्या इमारतींमधून ‘जीवनाला’ नवी पालवी फुटली आहे. सिमेंटच्या या इमारतींमधून झाडांची अनिर्बंध वाढ झाली आहे. केवळ ३५ वर्षात काहीही न करता एक नवे समृद्ध जंगल जन्माला येऊ घातले आहे. 

‘‘निसर्गामध्ये मानवाचा हस्तक्षेप नसेल तर निसर्ग स्वतःच स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे. त्याला कोणाच्याही मदतीची गरज नाही. ज्याप्रमाणे, रोपवाटीकेत तयार करण्यात येणारी वड अथवा पिंपळाची झाडे जगवण्यासाठी मानवाला खूप प्रयत्न करावे लागतात परंतू पक्ष्यांच्या विष्ठेतून बीजारोपण झालेल्या रोपांची दगडांवर देखील रुजण्याची शक्ती अद्वितीय असते.’’

या घटनेतून अखिल मानव समुदायाने एक नक्की लक्षात घेतले पाहीजे की आपण सृष्टी निर्माण करू शकत नाही. पावसाळ्यात शहराबाहेर जाऊन रानाडोंगरात ‘सिडबॉल’ टाकणे अथवा वृक्षारोपणासाठी दर्‍याडोंगरात जाणे ही मनुष्याच्या ‘भटकंतीची’ गरज असू शकते, परंतु गुलमोहर, निलमोहर अथवा रेनट्री यासारखी अमर्याद फोफावणारी परदेशी झाडे लावून निसर्गाचे भरून न येणारे नुकसान आपण करत असतो. या उद्योगातून ‘पर्यावरण मित्र’ म्हणवून घेण्यासाठी आटापिटा करणे अथवा असली वृक्षारोपणे करून सोशल मिडीयावर स्टेटससाठी सेल्फी घेणे एवढीच आपली इति कर्तव्यता नाही. त्यापेक्षा जंगलांमध्ये जाऊन निसर्गाच्या कार्यात ढवळाढवळ न करता निसर्गाचा आस्वाद घेता आला तरी पुरे ! जंगलतोड थांबली पाहिजे तशी डोंगरतोड देखील थांबली पाहिजे. 

निसर्गच आपल्याला घडवत असतो, आपण निसर्गाला घडवू शकत नाही याचे भान राखण्याची गरज आहे. झाडे लावा, झाडे जगवा या घोषवाक्यातील दूसरा भाग जास्त महत्वाचा आहे. निसर्गाच्या कृपेने आलेल्या प्रत्येक झाडाला जगवता आले पाहिजे. पर्यावरणाविषयी स्नेहभाव असायला हवा, वनचर हेच आपले सहचर आहेत, त्यांच्या विषयी आदर व कृतज्ञता आपण सर्वांनी बाळगायला हवी. निसर्गाच्या मुळ रुपात अधिक्षेप केला तर निसर्ग काय काय करु शकतो याची झलक आपण सभोवती घडत असलेल्या या ‘करोना’ कालखंडात उघड्या डोळ्याने पहातो आहोत.

‘इदं न मम’ याचा अर्थ हे माझे नाही किंवा माझे काहीही नाही. सनातन धर्मातला हा एक अमूल्य संस्कार आहे. ‘अग्नये स्वाहा’ असे म्हणून यज्ञात आहुती टाकल्यानंतर त्याच्या शेवटी ‘इदं न मम’ असे म्हणायचे असते. त्याचप्रमाणे निसर्गाला आपण काही दिल्यानंतर कोणताही अभिमान न बाळगता ‘इदं न मम’ यातले माझे काहीही नाही’ असे म्हणणे क्रमप्राप्त असते.

  • श्रीनिवास गर्गे

Loading

%d bloggers like this: