जागतिक तत्त्वज्ञान दिन

जग बदलण्यासाठी काही व्यक्ती चिरंतन कार्य करीत असतात. अशा व्यक्तींना इतिहासात स्थान मिळते. भगवान श्रीकृष्णापासून ते महात्मा गांधीपर्यंत आणि भगवान बुद्धांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत, प्रत्येकाने आहे ते जग बदलून सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्ध स्वतःबद्दल बोलतांना नेहमी सांगत असत, ‘मी मार्गदाता आहे मोक्षदाता नाही’. 

सॉक्रेटिसने ‘हलाहल’ विष प्राशन करून मृत्युला कवटाळले तो दिवस

जागतिक तत्त्वज्ञान दिवस म्हणजे सॉक्रेटिसचा मृत्युदिवस. नोव्हेंबर महिन्यातला हा तिसरा गुरुवार ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. नुकताच १७ नोव्हेंबर २०२२ रोजी हा दिन पार पडला आहे.  युरोपातील अथेन्स येथे लोकशाहीच्या विरोधात तरुणांना भडकवण्याच्या आरोपाखाली तत्कालिन समाजाने सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा फर्मावली. वस्तुतः धर्मसंस्था आणि राज्यसंस्थांच्या भ्रष्ट राज्यकारभारापासून तरुणांना त्यांच्या अवस्थेबद्दल सजग करत असल्यामुळे सॉक्रेटिस दोषी ठरला होता. परिस्थितीत बदल व्हावा या दृष्टीकोनातून त्याने हे ‘नवविचार’ तेव्हा मांडले होते. त्याचे हे विचार राज्यद्रोहास पात्र ठरले होते. नाहीतरी अभ्यासपूर्ण आणि सखोल तत्त्वज्ञान हाच क्रांतीचा उद्गम असतो, हे आपण इतिहासात कायम बघत आलो आहोत.

फ्रेंच तत्त्ववेत्ता बाद्यु या घटनेला (नवविचारांना) तत्त्वज्ञानाची सुरुवात मानतो. तत्त्वज्ञान लोकांना भ्रष्ट करते असा सॉक्रेटिसवर आरोप होता. हे ‘सॉक्रेटिस’ ने मान्य केले आणि तो विषाचा पेला रिचवला. खरतरं हा मृत्युदंड टाळताही आला असता. सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो याने तसे आपल्या गुरुला सांगून पाहिले होते. परंतू त्याला स्पष्टपणे नकार देत त्याने ते ‘हलाहल’ विष प्राशन करून मृत्युला कवटाळले. ‘तत्वज्ञान हे कायम मानवाला परिस्थितीची जाणीव करून देईल, परिस्थितीत बदल करून नवीन समाज निर्माण करेल.’ असे तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला होता. येणार्‍या नविन पिढ्यांसाठी त्याचे हे ‘तत्त्वज्ञान’ चिरंतन लक्षात ठेवले जाईल आणि म्हणूनच सॉक्रेटिसचा मृत्यूदिन हा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.

फ्रेंच तत्त्ववेत्ता बाद्यु याने सॉक्रेटिसच्या मृत्यूची नोंद घेऊन त्या घटनेला तत्त्वज्ञानाची सुरुवात मानले. असे असले तरी ज्या काळात सुदूर युरोपमधील ‘अथेन्स’ मध्ये सॉक्रेटिस कार्य करीत होता नेमके त्याच काळात भगवान बुद्ध भारतातील लोकांना सुबुद्ध करीत होता. ही दोघेही महापुरुष समकालीन होते. खरतरं त्याही आधीपासून आपल्याकडे ‘भगवद्‍गीता’ सांगणारा आणि तत्कालिन लोकांचे जीवन समृद्ध करणारा श्रीकृष्ण सर्वांना मार्गदर्शन करीत होता. त्याही पूर्वी सनातन संस्कृतीमधील ‘उपनिषदांचे’ तत्त्वचिंतनाचे कार्य वेदोत्तर काळात समाजमन उन्नत करीत होते. अगदी अलीकडे अवघ्या १३०० वर्षांपूर्वी म्हणजेच इसवीसन ७०० च्या दरम्यान आद्य गुरु शंकराचार्यांनी ‘अद्वैत’ तत्त्वज्ञानाची ओळख जगाला करून दिली आहे.  तत्त्वज्ञानाचा हा समृद्ध भारतीय वारसा या निमित्ताने जागतिक तत्त्वज्ञान दिनी आपण सर्वांनी अभिमानाने मिरवायला नको का? 

Loading

%d bloggers like this: