समुद्राचे पाणी पिणारा ‘अगस्ती’ तारा

दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान दक्षिण क्षितीजावर चमकणारा तारा लक्ष वेधून घेत असतो. अग्नेय्येकडून नैऋत्येकडे संथपणे वाटचाल करणारा हा ‘अगस्ती’ (Canopus) नावाने ओळखला जाणारा तारा आहे. वैदिक साहित्यामधील सर्वात जून्या समजल्या जाणार्‍या ऋग्वेदामध्ये ‘अगस्ती’ ऋषींचा उल्लेख आढळतो. याच ‘अगस्ती’ ऋषींचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या ‘सागरा प्राण तळमळला’ या काव्यातून करतांना दिसतात. कर्झन वायलीच्या वधानंतर इंग्लंडमधे सावरकरांच्या मागे ब्रिटीश पोलिसांचा ससेमिरा लागला होता. या दरम्यान ब्रायटनच्या समुद्र किनार्‍यावर त्यांना ‘सागरा प्राण तळमळला’ हे जगप्रसिद्ध विरहगीत सुचले होते. 

समुद्रप्रवास करून शिक्षणासाठी सावरकर इंग्लंडला गेले होते. त्याच सागरावर रागावलेले सावरकर पहिल्या कडव्यात समुद्राला म्हणतात ‘भुमातेच्या चरणतला तुज धुता । मी नित्य पाहिला होता ।’ माझ्या मातृभुमीचे पाय धुतांना मी तुला नेहमी पाहिले होते. आज इथे परदेशातल्या तुझ्या किनार्‍यावर तुझा तोरा दाखवतोस काय ?

या फेन-मिषे हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमी ते ?
मन्मातेला अबल म्हणुनि फसविसी । मज विवासना ते देशी
तरि आंम्लभूमी भयभीता । रे, अबला न माझिही माता । रे

त्याच काव्याच्या शेवटच्या कडव्यात सागराला दम देण्याच्या भाषेत ते म्हणतात. तुझ्या फेसाळलेल्या लाटेच्या आवाजाने हसून मला खिजवणार्‍या सागरा, तु मला परत माझ्या देशी नेशील असे वचन तु मातृभूमीला दिले होते. या आंग्लभूमीला घाबरून तु माझा वचनभंग करतो आहेस. मात्र तु माझ्या मातेला अबला समजू नकोस.

कथिल हे अगस्तिस आता । रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला, सागरा, प्राण तळमळला  

तुला आठवते का? आमचे ऋषी अगस्ती एका क्षणात तुला प्यायले होते. तुला नामशेष केले होते. अगस्तीचा वारसा सांगणारे आम्ही तुला धडा शिकवु !  हतबल असतांना देखील सागराला दम देणार्‍या कवी मनाच्या सावरकरांचा आवाका विराट होता.

वृत्तासुर नावाचा राक्षस पृथ्वीवर देवतांना त्रास देत होता. तेव्हा इंद्राने ब्रह्मदेवाकडे मदत मागितली. त्यावेळी ब्रह्मदेवाने महर्षी दधीचींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राने वृत्तासुराला मारण्याचा मार्ग सांगितला. या वज्राचा वापर करून इंद्राने वृत्तासुराचा वध केला. हे बघितल्यानंतर इतर राक्षस आपला जीव वाचवून समुद्रात जाऊन लपले. राक्षस दिवसा समुद्रात लपत असत आणि रात्रीतून समुद्रातून बाहेर येऊन देवतांना आणि ऋषींना त्रास देत असत. या जाचाला कंटाळून देवता भगवान विष्णुंकडे गेले. भगवान विष्णुंनी त्यांना अगस्ती ऋषींकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सर्व देवतांनी अगस्त्य ऋषींना हा प्रकार सांगितला. समुद्रात लपलेल्या या राक्षसांना मारण्यासाठी अगस्ती ऋषींनी समुद्राचे सर्व पाणी पिऊन टाकले. अखेरीस पाणी संपल्यानंतर लपलेल्या या राक्षसांचा देवतांनी वध करून त्यांची दहशत संपविली. ही कथा लहानपणापासून कधी ना कधी आपण ऐकली आहे. 

अगस्ती ऋषींची अजून एक कथा जनमानसात रुढ आहे. त्याकाळात मेरू पर्वत सर्वात उंच होता. मेरु पर्वताची उत्तुंग शिखरे पाहून विंध्‍य पर्वताला इर्षा निर्माण झाली व त्याने त्याची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. विंध्य पर्वताच्या वजनाच्या असंतुलनामुळे पृथ्वीच्या कालगणनेत फरक पडू लागला. त्यामुळे विंध्य पर्वताचा गर्व वाढू लागला. तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना साकडे घातले. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करत असतांना अगस्ती ऋषींना वाटेत विंध्य पर्वत लागला. अगस्ती ऋषीं कडे असणार्‍या अद्भुत सिद्धीं विंध्य पर्वताला माहित होत्या. त्यांचा आदर म्हणून विंध्य पर्वताने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. त्यावेळेस अगस्ती ऋषींनी ‘मी दक्षिणेतून परत येईपर्यंत त्याला त्याच अवस्थेत राहण्याची आज्ञा केली. ते दक्षिणेतून परत येतील या आशेने विंध्याचल पर्वत रांगा अजूनही तशाच झुकलेल्या अवस्थेत वाट पहात आहेत.

विंध्य अगस्ती कथेला एक खगोलशास्त्रीय आधार आहे. काही हजार वर्षांपूर्वी भुगर्भीय हालचालींमुळे विंध्य पर्वताची उंची वाढली. त्याकाळी अगस्ती तारा विंध्य पर्वताची उंची वाढल्यामुळे पर्वताच्या उत्तरेकडे असलेल्या भुभागांवरून दिसेनासा झाला. हा काळ काही हजार वर्षांपूर्वीचा असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पृथ्‍वीच्या परांचन गतीमुळे हा तारा अगस्त्य ध्रुव (दक्षिण ध्रुव) बनेल. आणि हे चक्र असेच चालु राहील.

पुढे विदर्भाचा राजा निमी याची कन्या लोपामुद्रा हिच्याशी त्यांनी विवाह केला. अगस्ती ऋषींनी तमिळ भाषेची अक्षरनिर्मिती केली असे मानले जाते. त्यांची सर्वाधिक मंदिरे दक्षिणेत आहेत. सर्वतोमुखी असलेले प्रसिद्ध श्रीललितासहस्त्रकम् स्तोत्राचे रचनाकार अगस्ती ऋषी आहेत. वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, स्थापत्यशास्त्र, नौकाशास्त्र, रत्नशास्त्र अशा अनेक ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. यातील अनेक ग्रंथ आजदेखील उपलब्ध आहेत. तर अशा या ऋषींचे कायमस्वरूपी स्मरण करून देणारा हा तारा.

व्याधाच्या तार्‍यापेक्षा थोडी कमी चमक असणारा अगस्ती तारा खरंतर खूप दूरचा तारा आहे. तुलनाच करायची झाल्यास व्याधाचा (Sirius) तारा सुर्याच्या तीनपट मोठा असून पृथ्वीपासून सुमारे ९ प्रकाशवर्ष दूर आहे तर ‘अगस्ती’ (Canopus) तारा सुर्याच्या ६५ पट मोठा असून आपल्या सौरमालेपासून ३१० प्रकाशवर्षे दूर आहे. असे असतांना सुर्याप्रमाणेच ‘अगस्ती’ तार्‍यामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्फीभवन होते अशी पुरातन काळापासून धारणा आहे. याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्यात सुर्य उत्तर गोलार्धाकडे सरकु लागतो, या दरम्यान अगस्ती तारा दक्षिण गोलार्धात अधिक वर येऊन चमकू लागतो. मे महिन्याच्या शेवटी हा तारा हळूहळू दक्षिण दिशेला अस्त पावू लागतो. याच्या अस्तानंतरच मान्सूनची सुरुवात होते. त्यामुळे समुद्राचे पाणी पिणारा ‘अगस्ती’ तारा ही ओळख त्याला मिळाली. 

चला तर मग ! डिसेंबर ते मे दरम्यान दक्षिण दिशेला दरवर्षी साध्या डोळ्यांनी सहज दिसणारा हा ‘अगस्ती’ तारा आकाशात शोधुया. पुराणातून, मिथकातून, आख्यायिकांतून आलेला आपल्या ऋषीमुनींचा समृद्ध वारसा या कथांमधून कणाकणांत साठवुया. आणि हो, यापुढे हा तारा पाहिल्यावर सव्वाशे वर्षांपूर्वी ब्रायटनच्या किनार्‍यावर ‘सागरा प्राण तळमळला’ हे विरहगीत गुणगुणारे सावरकर आणि हि कविता लिहून घेणारे त्यांचे मित्र निरंजन पाल यांचे स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.

  • श्रीनिवास गर्गे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: