कांचनवृक्ष

bauhinia variegata

कांचन ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. भारतीय संस्कृतीमध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. हे झाड मध्यम आकाराचे असते. त्याची साल गडद तपकिरी रंगाची आणि काहीशी गुळगुळीत असते. त्याचे नवे अंकुर तपकिरी रंगाच्या कोवळ्या लवीने झाकलेले असतात. या वृक्षाची पानगळ थंडीच्या मौसमात होते, कोवळी असताना त्यावर बारीक लव असते. परंतु जशीजशी मोठी होतात तसतशी त्यावरची लव नाहीशी होते. पानांचा पृष्ठभाग चामडयासारखा चिवट होत जातो. या सुंदर झाडाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात. पांढरी, गुलाबी अथवा हलक्या जांभळ्या  रंगावर गडद जांभळ्या छटा असलेली आणि सुवासिक असतात.

कांचनाची फुले पानाच्या खोबणीत किंवा फांदीच्या टोकावर येतात. फुलांचे देठ अतिशय लहान असतात. यातील चार पाकळ्या फिकट कोनफाळी रंगाच्या व पाचवी पाकळी गडद रंगाची असते. काही फुलांच्या एक किंवा दोन पाकळ्यांच्या मुळाशी पिवळ्या रंगाचे ठिपके असतात. ही फुले फारच आकर्षक व मनमोहक दिसतात. याच्या फुलांचा मौसम हा डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिल मध्ये असतो. पांढऱ्या रंगाच्या फुलांचा कांचन हे झाड नसून झुडूप आहे. याच्या शेंगा कठीण असतात. यामध्ये १० ते १५ बिया असतात. या शेंगा झाडावर असतानाच फुटतात व त्यातील बिया जमिनीवर पसरतात.

ही झाडे भारताच्या पूर्वेस म्यानमार, असाम मध्ये आढळून येतात. भारतात नागपूर व मध्यप्रदेश येथे ही झाडे मुबलक आढळतात. काही वेळा ही झाडे लावल्यावर दुसऱ्याच वर्षी ती बहरू लागतात. ही झाडे बऱ्याच प्रकारच्या मातीत रुजतात. उंच व पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीत लवकर रुजतात व बहरतात. नाजुक असल्यामुळे थंडीचा त्यावर चटकन परिणाम होतो. या झाडाची फारशी मशागत करावी लागत नाही, परंतु या झाडाची थोडीशी काळजी घेतली तर या झाडांचा चांगला फुलोरा येतो. या झाडाच्या तोडलेल्या फांद्या मातीत लावल्यास त्या रुजतात. फुले सुवासिक असल्यामुळे मधमाशा त्याकडे आकर्षित होतात व त्या माध्यमातून परागण होते. या झाडाच्या पावसाळ्यापूर्वी पडलेल्या बिया पावसाळ्यात त्वरित अंकुरित होतात व अश्या अंकुरित बिया झाडाच्या अवतीभोवती फार मोठया प्रमाणात पडलेल्या दिसतात. परंतु ज्या बिया मातीत रुजल्या आहेत किंवा पालापाचोळयात झाकल्या गेल्या आहेत अथवा ज्या बियांवर सूर्यप्रकाश पडत नाही अश्या बिया सोडून उरलेली कोवळी रोपे सुर्यप्रकाशामुळे सुकून जातात .

आपट्याची पाने आणि कांचनाची पाने काही प्रमाणात सारखी दिसतात. आकार साधर्म्यामुळे दसर्‍याच्या सुमारास याची पाने दसर्‍याचे सोने म्हणून बाजारात विकली जातात. निव्वळ दिसायला सारखे म्हणून कांचनाच्या पानांची दरवर्षी होणारी कत्तल जीवाला चटका लावून जाते.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: