नंदीची प्रतिक्षा

शिवमंदिरासमोर बसलेला नंदी सर्वांनी नक्कीच बघितला असेल. हा अनादि काळापासून शिवमंदिराच्या समोर प्रतिक्षेच्या अवस्थेत बसलेला दिसतो. खरतरं तो चिरंतन प्रतिक्षा करीत आहे. ‘वाट बघणे’ म्हणजे नेमके काय हे जर माहिती करून घ्‍यायचे असेल तर सहज एखाद्या मंदिराच्या प्रांगणात जाऊन त्याला निरखून बघा. ज्याप्रमाणे संत मिराबाई आजन्म श्यामसुंदराची वाट बघतांना रमून गेलेल्या दिसतात अथवा संत गोरा कुंभार विठ्ठल भक्तीत रममाण झालेले दिसतात त्याप्रमाणे परमेश्र्वरासोबत तादात्म्य पावण्यासाठी अशी अनंताची वाट पहाणे आपल्याला जमायला हवे.

नंदीची प्रतिक्षा

ताठपणे बसलेला, नजर अगदी सहजपणे अनंताचा वेध घेणारी, उंचावलेली मान, कान सतर्क, बैठक देखील अगदी साधी, पुढचे दोन पाय विनयाने मुडपून छातीखाली ठेवलेले. मागचे दोन पाय सैलपणे एकाबाजूला सोडलेले असे साधेपणाने बसून प्रतिक्षा करणे हे स्थितप्रज्ञाचे खरे लक्षण आहे. ध्यानमग्न अवस्थेत जाण्यासाठी असे साधेपणाने बसता आले पाहिजे. असा हा स्थितप्रज्ञ नंदी मंदिरासमोर कोणत्याही अपेक्षेने बसलेला नाही आहे. त्याला काहीही नको आहे. तो फक्त वाट बघतो आहे आणि अनंत काळापर्यंत तो वाट बघत बसून राहणार आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय शांतपणे बसून राहणे हाच ध्यानमग्न अवस्थेला पोहचण्यासाठी लागणारा महत्वाचा गूण आहे. 

आपण मंदिरात जातो तेव्हा नंदीचा हा गुण अंगी बाणवायला हवा. फक्त बसणे, कोणत्याही शक्यतेशिवाय, अपेक्षेशिवाय अथवा मागणीशिवाय ‘फक्त शांतपणे बसणे’. समाधी अवस्थेसाठी याहून अधिक काही नको आहे. ‘ध्यानाला बसणे’ ही एक क्रीया म्हणून त्याकडे बघितले जाते आणि हाच आपला गैरसमज आहे. कोणतेही विचार मनात येऊ न देता, कोणत्याही अपेक्षेशिवाय शांतपणे बसता येणे हे ध्यानमग्नतेचे खरे लक्षण आहे. 

प्रार्थना म्हणजे साक्षात देवाशी संवाद साधण्याचा प्रयत्न आणि ध्यानमग्नता म्हणजे परमेश्र्वर काही सांगू इच्छितो आहे का? हे जाणण्याचा निवांत प्रयत्न. प्रार्थना आणि ध्यानमग्नतेमध्ये हा मुलभूत फरक आपण लक्षात घ्यायला हवा. 

अगदी निट लक्ष दिले तर लक्षात येईल की नंदी नुसताच बसलेला दिसत असला तरी तो ग्लानीमध्ये बसलेला नाही. त्याचा चेहरा निट निरखून बघितला तर तो सतर्क आणि सक्रिय असल्याचे लक्षात येते. कोणत्याही प्रकारे थकलेला, झोपलेला, कंटाळलेला अथवा निष्क्रीय तो वाटत नाही. याउलट तो अत्यंत जीवंत आणि सतर्क वाटतो. बसलेला असला तरी कोणत्याही क्षणी तो भानावर येईल असेच त्याच्याकडे बघतांना जाणवते.

‘साधनेची ही अवस्था ध्यानाची पहिली पायरी आहे’ असे गाभार्‍यात निवांतपणे पहुडलेला परमेश्र्वर आपल्याला सुचवत असावा. नाही का? नाहीतर मंदिरात प्रवेश करण्‍यापूर्वी दरवाज्यात वाट बघणार्‍या नंदीच्या या मूर्तीचे नक्की काय प्रयोजन असावे?

Loading

%d bloggers like this: