माणूस शांत कसा होईल ?

चिंतन ही नितांत व्यक्तिगत आणि सापेक्ष बाब आहे. श्रवण आणि पाहण्याची प्रक्रिया ही एक अखंड घटना असते. यातून वाचन, सस्तंग आणि पुढे मनन, चिंतन, निदिध्यासन होते. यातील ‘चिंतन ही प्रक्रिया जीवनात क्रांती घडविते. व्यवहार जगताना दुसऱ्याचे ऐकणे, अनुकरण करणे या गोष्टी अपरिहार्य असतात. पण ‘सत्य’ शोधनाच्या मार्गात स्वतःचे चिंतन आणि निर्णय परिवर्तनाला मदत करीत असतात. संस्कृतमध्ये चिंता आणि चिता यातील फरक स्पष्ट करणारे एक सुभाषित आहे. जिवंतपणी माणसाला चिंता जाळते आणि मृतुनंतर चिंता. फरक फक्त अनुस्वाराचा आहे. चिंतन मात्र माणसाला मुक्त करते. अर्थात त्यानुसार वाटचाल केली नाही तर ते चिंतन निरुपयोगी ठरते. समजलेलं ‘सत्य’ तात्काळ जगण्यास प्रारंभ केला नाही तर तेच सत्य माणसाला संपवून टाकते, नष्ट करते. 

मग प्रश्न असा उपस्थित होतो की, दुसर्यांच्या चिंतनांचा आम्हाला काय उपयोग ? सत्याचा शोध घेत असताना आणि धार्मिक मनाची जडणघडण होत असताना दुसऱ्यांचा चिंतनाची मदत अवश्य होते. अर्थात त्याचा आधार घेत, पण त्यांच्या आश्रयाला न जाता केलेला पुरुषार्थ आमुलाग्र परिवर्तन घडवतो. 

व्यक्ती अशांत का असते ? त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी काही उपाय नाही काय ? हे प्रश्न घेऊन मागे एकदा माउंट आबुला संत अमिताभ यांच्याकडे जाणे झाले. सत्याचा शोध घेण्यासाठी ४० वर्षे त्यांनी आबुला वास्तव्य केले. आबुच्या ऐहिकतेपासून थोडे दूर, गोमुख-वशिष्ठ आश्रमाच्या वाटेवर या जैन संताचे वास्तव्य. कृश शरीरयष्टी, भेदक डोळे. दिवसातील बहुतेक वेळ मौनातच जात असे. प्रश्न आलेच आणि बोलणं झालंच तर अनाग्रही वृत्ती आणि संप्रदायमुक्त चिंतनाचा अनुभव येत असे. 

शरीर अस्वस्थ आहे म्हणून व्यक्ती अशांत असेल तर स्वस्थ असणारेही अशांत दिसतात. उत्तम कुटुंबसुख आहे, परस्परांत सामंजस्य आहे तरी व्यक्ती अशांत दिसते. स्वतःचे व कुटुंबातील इतरांचे भरणपोषण करण्यासाठी, उत्तम नोकरी, व्यवसाय वा व्यापार नाही म्हणून तो अंशात आहे असे म्हणावे तर ज्यांच्याजवळ हे सारे विपुल आहे तेही अशांत दिसतात, लाक्षधीशाही अशांत राहतो. पद नाही, समाजात प्रतिष्ठा नाही, कोणताही अधिकार नाही, आपल्याला कोणीही विचारत नाही ही टोचणी माणसाला अशांत करीत असते. पण ज्याच्याजवळ पद-प्रतीष्ठा-अधिकार आहेत तोही अशांत दिसतो! अखेर असं का व्हावं ? 

संत अमिताभ शांतपणे सांगत होते, “कोणतीही बाह्य वस्तू, सुख-सुविधा व्यक्तीला शांत करू शकत नाही. त्याच्याजवळ हे सारे असले तरी ‘आणखी हवे, सारेच हवे’ ही तृष्णा त्याला स्वस्थ बसू देत नाही. माझ्याजवळ आहे ते दुसऱ्याजवळ नसावे ही वृत्ती बनते, अखेरीस दुसऱ्याजवळचे हिसकावून घेण्यासाठी इच्छा प्रबळ होते. आपल्याजवळ आहे त्याचा उपयोग व उपभोग घेण्याऐवजी अन्य गोष्टींच्या मागे धावते आणि त्याचा सततचा विचारच व्यक्तीला अशांत बनवीत असतो. जोपर्यंत ही सवय राहील तोपर्यंत त्या व्यक्तीने काहीही केले, कितीही संस्तंग केले, कितीही प्राप्त (ऐहिक) केले तरी ती अशांतच बनलेली राहील.” शांत बनण्याचा एकमेव मार्ग आहे, द्रष्टाभावाची साधना. स्वतःच्या अंतरंगात डोकावणे. यातूनच तृष्णा आणि अपेक्षाचा हळूहळू विलाय होतो, व्यक्ती शांत होते, सत्यामध्ये प्रतिष्ठित होते.

पूर्वप्रसिद्धी – दै. गावंकरी, नाशिक

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: