तसे पाहिले तर नाशिक ही मंदिरांची नगरी आहे. सिटी आफ टेंपल. नाशिकचा गोदातीर समृद्ध करणारे काळाराम (१७८८), नारोशंकर (१७४७), सुंदरनारायण (१७५६), निळकंठेश्र्वर (१७४७), त्र्यंबकेश्र्वर (१७८६), अहिल्याबाई होळकरांनी रामकुंड येथे बांधलेले विश्र्वेश्र्वर मंदिर (१७८५) अशी अनेक पुरातन मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे हजारो वर्षे जूनी असून पेशव्यांच्या काळात या ऐतिहासिक वारश्याला झळाळी मिळाली.
सतराव्या शतकाच्या शेवटी परकीय राज्यकर्त्यांनी असंख्य मंदिरांची नासधूस केली होती, तर काही भ्रष्ट केली होती. रयतेमध्ये परचक्राविषयी आक्रोश होता. आणि म्हणूनच अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून पेशवे आणि होळकरांनी हे ‘नवजागरण’ घडवले होते. याच सुमारास महाराष्ट्रात पेशव्यांनी असंख्य पुरातन मंदिरांचा जीर्णोद्धार केला, कित्येक मंदिरांची नवनिर्मिती केली. या काळात अहिल्याबाई होळकरांनी देशभरात असंख्य मंदिरांची व घाटांची निर्मिती केली.
परचक्राने नष्ट केलेली काही पुरातन मंदिरे भ्रष्ट झाली होती तर काही काळाच्या उदरात गडप झाली. काहींच्या वाट्याला भग्नावस्था आली होती तर काही मानवी वस्तीपासून थोडे आडवळणाला असल्यामुळे किंवा अनास्थेमुळे कायम दुर्लक्षित राहीली होती. असेच एक मंदिर नाशिकपासून केवळ ३० किमी अंतरावर असून अनेक काळ अपरिचीत राहीले आणि किंबहुना त्यामुळे सुस्थितीतही राहीले.
श्रीगोंदेश्र्वर मंदिर हे सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे १२ व्या शतकात बांधलेले मंदीर आहे. गावाच्या वेशीवर असलेले हे मंदिर इ.स. ११६० साली बांधले असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. याकाळात सिन्नर परिसरात यादव वंशातील राजा ‘राव गोविंद’ यांचे शासन होते. खरंतरं नाशिक जिल्ह्यातील पुरातन वास्तुंच्या यादीत या मंदिराचा सर्वात वरचा क्रम लागतो, १९०९ साली या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषीत केले होते. यानंतर ३२ वर्षांनी त्र्यंबकेश्र्वरला हा दर्जा मिळाला. यावरून या मंदिराची महत्ता लक्षात यायला हवी.
हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैलीचा (हेमाडपंथी शैली) उत्तम नमुना आहे. नक्षीदार पाषाणांची एकावर एक चळत ठेवत शिखरापर्यंत केवळ गुरुत्वाकर्षणाचा आधार घेत ही रचना केली जाते. अशी अनेक नक्षीदार पाषाणे खाचा आणि खुंटांच्या आधारावर एकमेकांत गुंफलेली आहेत. दोन दगडांना सांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चूना अथवा सिमेंटचा वापर केलेला नाही. हे या बांधकामाचे वैशिष्ट्य.
मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार पुर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहे. इतर ठिकाणी मुखमंडपात असणारा नंदी या मंदिरासमोर स्वतंत्र मंडपात विराजमान आहे. मंदिराचा भवताल ऐसपैस आहे. सुशोभीकरण केले तर ‘ताज’ च्या तोडीस तोड होईल यात शंका नाही. पुर्वद्वारात स्वर्गमंडप आहे. मंदिरात प्रवेश करतांना मुखमंडपाच्या बाहेरील बाजूस कोरीवकामाने सजवले आहे. सभामंडपात असलेल्या खांबांवरील नक्षी बघतांना भान हरपून जाते. दक्षिणद्वाराच्या बाहेरील बाजूस सुरसुंदरी आणि रामायणातील अनेक प्रसंग कोरलेले आढळतात. उत्तर बाजूस देव-देवता, गंधर्व-अप्सरा आणि पौराणिक प्रसंगांचे सुंदर असे कोरीव काम आहे. गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे आणि या गर्भगृहाच्या वर मंदिराचे त्रिमितीय नक्षिकाम केलेले शिखर आहे.
सभामंडपातील खांबावर कोरीव काम केलेले असून भगवान नृसिंहावतार, गंधर्व-अप्सरा, रिद्धी-सिद्धी सहीत गणपती, यम-सत्यवान-सावित्री असे कितीतरी प्रसंग सुबकतेने कोरलेले आढळतात. शंकराच्या मंदिरात अभावाने आढळणारी वैशिष्ट्यपूर्ण मैथुनशिल्पे देखील या खांबावर आढळून येतात. बहुतांश शंकर मंदिरात गर्भगृहाच्या पायरीपाशी असणारा ‘कीर्तीमुख’ मात्र याठिकाणी सभामंडपातील खांबांवर कोरलेला आढळून येतो.
या मंदिराचे अजून एक वेगळेपण सांगता येईल. महादेवाच्या पिंडीवर वाहीलेले पवित्र जल मंदिराच्या बाहेर मकर मुखातून सोडले जाते. बहुतांश मंदिरात बाहेरील बाजूस गोमुख कोरलेले आढळते मात्र येथे नक्षिदार मकरमुखाचे कोरीव काम केलेले दिसून येते. तेराव्या शतकापूर्वी बांधलेल्या मंदिरात अशा प्रकारचे ‘मकरमुख’ पहावयास मिळते असे जाणकार सांगतात. मगर हे गंगेचे वाहन आहे. मगरीच्या मुखातून येणारे पवित्र जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी त्याकाळात मकरमुख कोरलेले दिसते.
ज्याप्रमाणे करविर निवासीनी महालक्ष्मी मंदिरात अयणकाळात सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मुर्तीवर पडतात, त्याचप्रमाणे याकाळात ‘गोंदेश्र्वर’ मंदिरात सोनेरी सूर्यकिरणे महादेवाच्या पिंडीवर जणू अभिषेक करीत असतात. सूर्यकिरणे थेट नंदी मंडपाला चिरत सभामंडपातून गाभार्यात प्रवेश करतात. यावेळी महादेवाच्या पिंडीची सावली पश्र्चिम भिंतीवर पडते. नुकत्याच काही वर्षांपासून दरवर्षी येथे या काळात किरणोत्सव साजरा केला जातो.
जगातील सर्वात मोठे असलेले हिंदू मंदिर ‘अंकोरवाट’ कंबोडीया येथे आहे. ज्याकाळात श्रीगोंदेश्र्वर मंदिराचे निर्माण होत होते त्याचकाळात ‘अंकोरवाट’ मंदिर बनविण्याचे कार्य सुरु होते. पुरी येथील कोनार्क मंदिर हे देखील श्रीगोंदेश्र्वर मंदिराचे निर्माण झाल्यानंतर १०० वर्षांनी बांधले गेले. तसे बघितल्यास नाशिकमधील काळाराम, सुंदरनारायण, नारोशंकर, विश्र्वेश्र्वर, निळकंठेश्र्वर आणि त्र्यंबकेश्र्वर या मंदिरांची निर्मिती अगदी अलीकडची म्हणजे अवघ्या तीनशे वर्षांपूर्वीची आहेत. या पार्श्र्वभूमीवर सुमारे ९०० वर्षे प्राचीन असलेले श्रीगोंदेश्र्वर मंदिराचे महत्व ठळकपणे लक्षात यायला हवे.
अजून एक अतिशय महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास हे मंदिर ‘शिवपंचायतन’ स्वरूपात बांधले गेले आहे. मुख्य शिवमंदिर मध्यावर बांधले असून इशान्य, अग्नेय, वायव्य आणि नैऋत्य या उपदिशांना पार्वती, गणपती, सुर्य आणि विष्णु यांची मंदिरे आहेत. पंचायतनाची ही अभिनव कल्पना आद्य शंकराचार्यांची होती.
विभिन्न उपास्य देवतांना मानीत असलेल्या उपासकांमध्ये त्याकाळात अनेक राग द्वेष असत. ते कमी करण्यासाठी आद्य शंकराचार्यांनी जाणीवपूर्वक पंचायतन पुजेची सुरुवात केली होती. त्या काळात उपासक ज्याची प्रधान पुजा करीत असेल त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या चारी उपदिशांना इतर चार देव ठेवून पूजा करण्याची परंपरा त्यांनी सुरु केली होती. असे म्हटले जाते की या पंचायतन पूजापद्धती मुळे माणसांच्या श्रद्धा जपल्या गेल्या आणि विभिन्न संप्रदायात असलेला राग द्वेषही त्याकाळी कमी झाला.
खरंतरं कुंभकाळात नाशिक-त्र्यंबकेश्र्वर पासून जवळ असलेल्या अपरिचित श्रीगोंदेश्र्वराकडे भाविकांची पावले वळवण्याची जबाबदारी शासनाने घ्यायला हवी. परकीय आक्रमणात काशी-मथुरे सारख्या असंख्य पुरातन मंदिरांची अनास्थेमुळे आबाळ झालेली आपण भोगतो आहोत. मात्र त्याच तोडीच्या या वैभवशाली मंदिराची ओळख आगामी कुंभकाळात भाविकांना शासनाने करून द्यायला हवी. विशेष करून शैव-वैष्णव संघर्षाच्या ऐतिहासीक पार्श्वभुमीवर या पंचायतन मंदिराचे अस्तित्व सर्व संप्रदायांना सनातनाच्या एकाच धर्मध्वजेखाली आणण्यास नक्कीच मदत करेल.
यानिमित्ताने शहराच्या जवळ असलेल्या सिन्नर सारख्या तालुक्याच्या जागेच्या विकासाला हातभार लागेल. दक्षिण-पश्र्चीमेकडून येणारी भाविकांची गर्दी शिर्डी-सिन्नर कडे नियंत्रीत करता येईल तर उत्तर पूर्वेकडून येणारी गर्दी वणी-दिंडोरी-ओझर कडे करता येईल.
तेराव्या शतकापूर्वी पंचायतन रचना असलेली असंख्य मंदिरे भारतात आढळून येतात. इ.स. ९५० ते १०५० च्या दरम्यान मध्यप्रदेशात खजुराहो येथे चंडेल राज्यकर्त्यांनी अशा प्रकारची मंदिरे निर्माण केल्याचे दिसून येते. येथील विश्र्वनाथ मंदिर आणि श्रीगोंदेश्र्वरामध्ये कमालीचे साम्य आहे. दोन्ही मंदिरे पंचायतन पद्धतीने बांधली गेली आहेत, तसेच नंदीसाठी स्वतंत्र मंडप आणि सभा मंडपाच्या छतावरील कोरीव काम यात कमालीचे साम्य आहे. श्रीगोंदेश्र्वर मंदिरातील सभामंडपात असलेल्या खांबावर असलेले मैथुनशिल्पावर देखील खजुराहो येथील शिल्पशैलीची छाप असल्याचे जाणवते. खजुराहो येथील मंदिरे नंतरच्या काळात जंगलाने वेढली गेल्यामुळे अनेक शतके अपरिचीत राहीली आणि त्यामुळे सुरक्षित देखील राहीली.
ऊत्तम लेख आहे, मंदिर हे चैतन्याचा स्रोत आहे तसेच मंदिर आपली संस्कृती आहे. त्यातल्या त्यात पूरातन मंदिरांना ऐतिहासिक, पौराणिक महत्व असल्याने त्या मंदिराचे संवर्धन करणे प्रत्तेक हिंदूंची आणि पर्यायाने शासनाची सुध्दा जबाबदारी आहे. वारसा जपला तरच संस्कृती टिकेल.
व्यवसायानिमित्त माझी संपूर्ण भारतात भटकंती होत असते. त्यात अनेक तीर्थस्थानांचाही समावेश असतो. प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर दक्षिणेकडील मंदिराचा करायला हवा. आजही हजारो वर्षा पूर्वीची मंदिरे आणि त्यांचे पावित्र्य टिकवून आहे, त्याचे कारण म्हणजे त्या प्रांतांतील जनसमूदायात प्रचंड आस्था, श्रध्दा असल्याने आजही तेथिल मंदिर दिमाखात ऊभी आहेत, मंदिर व्यवस्थापन समित्या ह्या शासनावर अवलंबून न राहता वैयक्तिक जबाबदारी ने सर्व देखभाल करत असतात.
आपल्या कङे सुध्दा मंदिर व्यवस्थापन समित्या अस्तित्वात आहेत पण वैयक्तिक हेवेदावे, अनास्था ह्यातच गुरफटलेली आहेत.
Absolutely fantastic way you made it simple to understand the basic procedure behind the ancient chanting styles of mantra. that is Shruti…