जगातील सर्वात जूने ओळखले जाणारे वाङ्मय म्हणून ज्याची ख्याती आहे. केवळ भारताचाच नव्हे तर अखिल विश्र्वाचा सांस्कृतिक वारसा असलेले वेद, उपनिषदे आणि त्यावर आधारित साहित्याचा हा खजिना 5000 वर्षे जुना आहे. हे सर्व साहित्य हजारो वर्षांपासून आपल्या नसा-नसातून वाहत आले. कोणत्याही प्रकारची मुद्रण व्यवस्था नसतांना आजच्या भाषेत हा ‘डेटा’ (सॉफ्टकॉपी) पाच हजार वर्षे कोणत्याही हार्डवेअर शिवाय सुरक्षित कशी करून ठेवली असावी हा प्रश्र्न पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्र्नाचे उत्तरही मनोरंजक आहे.
वेद, त्याची संहिता, त्यात वेदांचे चार प्रकार, त्यांच्या शाखा, आरण्यके, उपनिषदे, सुत्र-साहित्य, वेदांगे …. अबबब… आपण थक्क होऊन जातो. प्रत्येक वेदांमधील सुमारे पाच दहा हजार मंत्र काळाच्या ओघात कधीच विसरून जायला हवे होते. परंतू तसे झाले नाही. अगदी अलिकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीची छत्रपतींच्या काळामधली मुळ कागदपत्रे हरवली, नष्ट पावली, पूरात गेली, आगीत गेली अशा असंख्य उत्पातांमधून वाचलेल्या थोड्याफार कागदपत्रांच्या आधारावर इतिहासाची रचना आपण करतो आहे. या उलट ५००० वर्षांपासून कोणतीही क्षती न होता वेद साहित्य जसेच्या तसे आज आपण म्हणतो आहोत.
या सर्व गोष्टींचा अभ्यास पाच हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी अगदी बारकाईने केला होता असे दिसते. लिहून ठेवलेली कागदे, भुर्जपत्रे, छापिल पुस्तके यासारख्या भौतिक वस्तु कालांतराने नाश पावतात ह्याची त्यांना जाण असावी. स्मरणाचा हा ठेवा या रुपाने चिरंतन राहू शकेल असा त्यांना सार्थ विश्र्वास होता. वेदांमधील प्रत्येक ऋचा पाच हजार वर्षांपूर्वी जशी म्हटली जात होती अगदी तशीच आजदेखील म्हटली जाते असे ठाम विधान आपण करू शकतो. याला कारण आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रमांमधून हि विचारधारा अशी ओघवत ठेवली.
गुरुकुल पद्धतीमध्ये वेदांमधील मंत्र किंवा ऋचा ह्या सर्वप्रथम पाठ करवून घेतल्या जात असत. हे मंत्र पाठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात आहेत. संहितापाठ, पदपाठ आणि क्रमपाठ अशा पद्धतीने त्या पाठ केल्या जातात. त्यामधील संधींसह म्हणणे म्हणजे संहितापाठ, संधी तोडून (गद्यासारख्या) म्हणणे म्हणजे पदपाठ, आणि क्रमांची आलटापालट करून म्हणणे म्हणजे क्रमपाठ. एकच मंत्र अशा तीन प्रकारच्या पाठ पद्धतीने पाठ केल्यामुळे तो उत्तम पाठ होत असे. पद पाठामध्ये संधी तोडून म्हटल्यामुळे प्रत्येक शब्द सुटा करून म्हटल्यामुळे त्यामधील गाभा सहजपणे कळत असे आणि क्रमपाठामुळे एखाद्या मंत्राचा क्रम सहजपणे कायमचा लक्षात रहात असे. याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेदपठन करतांना प्रत्येक शब्द आणि प्रत्येक अक्षर उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ हा निर्धारीत करण्यात आला आहे.
1 | 2 | 2 | 1 | 1 | 2 |
2 | 3 | 3 | 2 | 2 | 3 |
नाच | रे | रे | नाच | नाच | रे |
रे | मोरा | मोरा | रे | रे | मोरा |
याशिवाय हेच वेद विकृतींसह म्हणण्याचे आठ प्रकार आहेत. ते प्रकार म्हणजे जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि घन. यामधील प्रत्येक विकृतीचे काही एक नियम आहेत. त्या नियमांमध्ये बसवून मंत्रांचे उच्चारण करणे. उदाहरणादाखल घनविकृतीची प्रक्रीया जटील स्वरूपाची असते. जर मंत्रांमधील शब्दांचा मुळ क्रम १ / २ / ३ / ४ / ५ जर असा असेल तर घनपाठ म्हणतांना तो क्रम पुढील प्रमाणे
समजण्यास सोपे जावे म्हणून ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ ही कवीता ‘जटा’ व ‘घन’ या क्रमामध्ये खाली रचली आहे. या लेखासोबत प्रत्यक्ष युट्युब वरील धागा सामाईक केला आहे. गायत्रीमंत्राचे या विकृत्तींमधील उच्चार कसे करतात याचा प्रत्यक्ष अनुभव येथे घेऊ शकता.
1 | 2 | 2 | 1 | 1 | 2 | 3 | 3 | 2 | 1 | 1 | 2 | 3 |
नाच | रे | रे | नाच | नाच | रे | माेरा | मोरा | रे | नाच | नाच | रे | मोरा |
2 | 3 | 3 | 2 | 2 | 3 | 4 | 4 | 3 | 2 | 2 | 3 | 4 |
रे | मोरा | मोरा | रे | रे | मोरा | 🥭च्या | 🥭च्या | नाच | रे | रे | नाच | 🥭च्या |
विशेष म्हणजे विकृतींसह मंत्र म्हणत असतांना शब्दांचा क्रम बदलल्यामुळे अर्थबदल न होण्याची काळजी देखील घ्यावी लागते. अर्थात याचे श्रेय आपल्या मातृस्वरूप भाषेला म्हणजे संस्कृतला द्यावे लागेल. संस्कृतमध्ये शब्द क्रम बदलल्यामुळे अर्थ बदल होत नाहीत. बर्याच अंशी मराठी भाषेमध्ये देखील हाच नियम लागू होतो. ‘रामाने रावणाला मारले’, ‘रावणाला रामाने मारले’, ‘मारले रामाने रावणाला’ किंवा ‘मारले रावणाला रामाने’ असे कसेही म्हटल्यामुळे अर्थबदल होत नाही. हेच इतर भाषांच्या बाबतीत होत नाही. इंग्रजीमध्ये Rama killed Ravana चे Ravana Killed Rama असा अनर्थ होऊन जातो. यादृष्टीने पाहू जाता संस्कृत ही जगातील समृद्ध भाषा आहे हे लक्षात येईल.
ज्या प्रमाणे शास्त्रीय संगीतामध्ये एकच पद अनेकदा म्हटले जाते, शब्दांवरील आघातांमध्ये बदल करून अपेक्षित परिणाम साधले जातात, आरोह-अवरोहांच्या माध्यमातून स्वरांचा धांडोळा घेतला जातो त्याप्रमाणे वेदांमधील मंत्रांच्या क्रमात नियमबद्ध बदल करून ते कायमस्वरूपी मेंदुमध्ये साठविले जाण्याची क्रीया याद्वारे होत होती. मंत्रांमधील क्रमांचा परम्युटेशनच्या माध्यमातून मेंदूमधील हार्डडिस्कमध्ये परमनंट सेव्ह करण्याच्या ह्या प्राचीन पद्धती होत्या.
आपले पूर्वज केवळ वेद पाठ करून थांबले नाहीत. त्यांच्या उच्चारांच्या पद्धती त्यांनी विकसीत केल्या आहेत. उच्चारातील सुक्ष्म फरकांचा अभ्यास करून त्याचे तांत्रिक विश्र्लेषण केले आहे. ‘च’मत्कार या शब्दामधील ‘च’ आणि चतकोर शब्दामधील ‘च’ यामधे फरक आहे असे वर्ण शोधून त्याचे वर्गीकरण केले आहेत. जगामधील असंख्य भाषांमधून सर्वोत्कृष्ट उच्चारपद्धतीं शोधल्यास ती वेदांमधल्या भाषेमध्ये आहे. वैविध्यपूर्ण उच्चारांनी समृद्ध असलेली ही भाषा अनेक भाषांचा स्त्रोत आहे.
वेद शिकवीतांना उच्चारांच्या पद्धती लक्षात ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी हस्तमुद्रांचा आधार घेतला. वेदोक्त मंत्र म्हणतांना आजही ब्रह्मवृंद आपल्या हातांच्या लयबद्ध हालचाली करतांना दिसून येतात. हात, मान आणि बोटांपासून बनविलेल्या विविध मुद्रांच्या आधारे उच्चारांमधील वेळ, उच्चारांची तीव्रता, र्हस्व, दीर्घ यांचा विचार केला गेला आहे. मंत्रपठण सुरु असतांनाच हातांच्या व बोटांच्या प्रमाणबद्ध हालचाली कवायतींसारख्या करून घेतल्या जातात. त्यामुळे कोणत्या शब्दावर किती जोर द्यायचा व कोणत्या शब्दाचा कोमल उच्चार करायचा हे ठरवून दिलेले आहे. गेल्या ५००० वर्षात यामध्ये देखील काही बदल झाला नाही हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
अशा श्रृती स्मृतींच्या माध्यमातून जतन करून ठेवण्यात आमच्या पुर्वजांनी यश मिळविले आहे. म्हणूनच वेदांना ‘श्रृती’ असेही म्हणतात. सहजपणे विचार करू जाता ही पद्धती कायमस्वरूपी सेव्ह करण्याची सर्वोत्तम पद्धती आहे असेच दिसून येईल. कारण मुद्रित केलेले वाचतांना, म्हणतांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. एकच शब्द १० कोसांवर म्हणतांना बदलतो. त्याचा अपभ्रंश होतो आणि पुढे जाऊन अपभ्रंश झालेला शब्द अधिक प्रचलित होतो असे दिसून येईल. लिपींमधील असलेल्या वेगवेगळ्या तृटींमुळे देखील मुळ शब्द लिहीतांना वेगळा तर टाईप करतांना वेगळा होतो. वाचतांना तर अजूनच वेगळा होतो. ज्ञानेश्र्वर हा शब्द मध्य भारतीय ‘ज्ञानेश्र्वर’ असा उच्चार करतात तर उत्तर हिंदुस्थानात ग्यानेश्र्वर असा उच्चार होतो. कालांतराने हाच उच्चार लिपीमध्ये उतरतो. याचा अर्थ लिपींच्या माध्यमातून संग्रहीत (सेव्ह) करून ठेवलेला शब्द पुढे जाऊन तसाच वाचला जाईल याची कोणतीही खात्री नाही.
स्वरांच्या माध्यमातून कानाद्वारे विद्या ग्रहण करायची, (हातांच्या हालचालींसह) परम्युटेशनच्या आधाराने ती मेंदूमध्ये सेव्ह करायची आणि मुखाद्वारे ती विद्या परत पुढच्या पिढीला सस्वर (प्रमाणबद्ध हालचालीसह) प्रदान करायची. एखादे साहित्य अशा प्रकारे हजारो पिढ्यांमधून संक्रमीत करायचे हे नक्कीच सोपे नाही. अखिल विश्र्वात यासारखे दूसरे कोणतेही उदाहरण नाही.
वेदांना अपौरुषेय समजले जाते. कोणाही व्यक्तीने याची निर्मिती केली नाही असा याचा अर्थ घेतला जातो. माझा तर्क थोडा वेगळा आहे. वेदांमधील या श्रृती कोणाही एका व्यक्तीने लिहून ठेवल्या नाहीत. ‘श्रृती’ याचा अर्थ ऐकणे आणि ‘स्मृती’ याचा अर्थ लक्षात ठेवणे. प्रत्येक विद्यार्थ्याने ऐकल्यानंतर जसेच्या तसे स्मरणात ठेवणे. एवढेच सूत्र प्रत्येक पिढीने पाळले तरी ही वेदांची सरिता गेली किमान पाच हजार वर्षे तरी वहात आहे. हे कोणाही एका व्यक्तीचे काम नाही तर समुहाने करायचे काम आहे. आणि म्हणूनच वेद हे अपौरुषेय आहेत असे मी मानतो. या पद्धतीने केवळ चार वेदच नव्हे तर १०८ उपनिषदे, ४ अरण्यके, ६ ब्राह्मण वेदांगे, भगवद्गीता, 4 उपवेद, २ महाकाव्ये, १८ पुराणे, २१ उपपुराणे, ८ प्रकारची सूत्रे, ६ प्रकारची दर्शन शास्त्रे असे बरेच काही या स्मृतींनी जतन करून ठेवले आहे.
पूर्वप्रसिद्धीः सावाना दिवाळी अंक – 2018 (सार्वजनिक वाचनालय, नाशिक)
- श्रीनिवास गर्गे