दूरदर्शी विवेकानंद

युगपुरूष स्वामी विवेकानंद यांची 158 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. 1863 साली स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. यावर्षी या घटनेला 158 वर्षे पूर्ण होत आहेत. आज ४ जुलै २०२१, आज या योद्धा संन्याशाची ११९ वी पुण्यतिथी. या निमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण.

स्वामीजी हे केवळ एक धर्म-उपासक किंवा प्रचारक नव्हते तर त्यांनी आपल्या धर्मातील बलस्थाने ओळखून धर्माचा उपयोग आदर्श समाजव्यवस्थेमध्ये कसा होईल याचा सातत्याने विचार केला. प्रखर राष्ट्राभिमान बाळगणारे ते एक ‘योद्धा सन्याशी’ होते. अवघ्या 39 वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात त्यांनी आपणा भारतीयांवर अनेक उत्तमोत्तम संस्कार करून ठेवले आहेत. Arise, Awake and stop not untill your goal is achieved. यासारखे प्रेरणादायी असे अनेक संदेश त्यांनी जगभरातील तरूणांना दिले आहेत.

स्वामीजी हे आधुनिक विचारांचे होते. त्यांना सुंदर, बलशाली आणि वैभवशाली भारत घडविण्याचे स्वप्न होते. जोपर्यंत जात-पात, स्पृश्य-अस्पृश्य, रुढी-परंपरा जीवंत आहेत तोपर्यंत या देशाचा विकास होणार नाही, या मताशी ते ठाम होते. विशेषतः तरुणांना ते उपदेश करीत ‘‘बलदंड व्हा, बलशाली व्हा !’’ कारण शरीर उत्तम असेल तरच तुम्ही आयुष्यात अनेक प्रकारचे आनंद घेऊ शकता. त्यांना अनेक क्रीडा प्रकारांमध्ये रूची होती. त्यापैकी फूटबॉल हा त्यांच्या अतिशय आवडीचा खेळ होता. ‘‘गीताभ्यासापेक्षा फुटबॉल खेळा, भारताला तरूणांपासून धर्म नव्हे तर विज्ञान हवे आहे, तुमचे आनंदी असणे हे तुम्ही धार्मिक (आध्यात्मिक) असण्याचे पहिले लक्षण आहे’’ असे ते म्हणत.

स्वामीजींसमोर उदात्त भारताचे स्वप्न होते, ते साकार करण्यासाठी त्यांनी आजन्म प्रयत्न केला. हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेत गेले. त्यांच्या सर्वधर्म परिषदेमधील भाषणाकडे, जगातील सर्व धर्मातील बंधुभाव वाढविण्याच्या कार्यातील मैलाचा दगड म्हणून, आजही ओळखले जाते. सव्वाशे वर्षांपूर्वी जागतिक महायुद्धांच्या गडद पार्श्र्वभूमीवर त्यांनी धर्माधर्मातील अदृश्य भिंती काढून टाकण्याचा अमूल्य असा संदेश सर्व जगाला दिला. असे विचार यापूर्वी कोणीही मांडलेले नव्हते. सर्वच धर्म हे सारखे असून त्या त्या धर्माने मानवतेसाठी कार्य करणे, प्रथम स्वतःमध्ये आनंद निर्माण करून इतरांना त्या आनंदात सहभागी करून घेण्याने सर्व जग सुखी होईल, हा आपल्या वेदांमधला संदेश त्यांनी सर्व जगाला दिला.

स्वामी विवेकानंदांनी जगभर प्रवास केला. एकदा पॅरिस येथे गेले असतांना त्यांनी तेथील विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. परदेशातील वैज्ञानिक प्रगती पाहून भारतात देखील अशी प्रगती व्हावी, याकरीता त्यांनी प्रयत्न केला. स्वामीजींचा दृष्टिकोन हा नेहमी वैज्ञानिक आणि सुधारणावादी होता. महिला सबलीकरणाची मुहूर्तमेढ भारतात स्वामीजींनीच केली. महिला सक्षम झाल्या तर आपोआपच पुढील पिढी ही खर्‍या अर्थाने साक्षर होईल असे ते म्हणत. त्याकाळी कट्टर धर्मांध लोकांचा त्यांना विरोध सहन करावा लागला होता. असे असतांना केवळ वेदपठण केल्याने किंवा गीतापठण केल्याने धर्म टिकणार नाही, तर त्यामधील तत्त्वांचा अंगिकार केल्यानेच उत्क्रांती होईल असा विश्र्वास त्यांनी सर्वांना दिला. आत्मज्ञान हे आम्हा भारतीयांकडे आहे आणि समाज सुधारणेसाठी आवश्यक असलेले विज्ञान पाश्र्चात्यांकडे आहे. जे चांगले ते सर्व आत्मसात करण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा त्यांचा संकल्प होता. विशेषतः पश्र्चिमेकडील नागरी संस्कार अनुभवून भारतात देखील तरूणांवर त्यांनी संस्कार केले आहेत. रस्त्यांवर स्वच्छता राखा, थुंकु नका, आपले घर-अंगण-गांव-शहर-देश यावर प्रेम करा, त्याला सुंदर ठेवण्याचे कार्य आपले आहे. असा संदेश ते तरूणांना वारंवार देत. आज 158 वर्षांनंतर देखील आम्ही त्यांना आमचे दिशादर्शक मानतो. त्यांनी दिलेले संदेश संक्रमित करण्याची फार मोठी जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. त्याचे अनुपालन करण्याची यानिमित्ताने आपण प्रतिज्ञा करू या ! “Dare to be free, dare to go as far as you’re thoughts leads, and dare to carry that out in your life”

Loading

3 Replies to “दूरदर्शी विवेकानंद”

  1. छान लेख आहे. खरतर स्वामी विवेकानंद यांच्या विषयी बरेच वाचन झाले आहे. पण हा लेख त्या सगळ्यात वेगळा आहे. मनाला भावतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: