पत्ता माहित नसलेला रस्ता

गेल्या शतकाच्या शेवटी म्हणजे १९९६ ते १९९८ या काळातली ही कथा आहे. लॅटिन अमेरीकेमध्ये होंडुरस येथे चोलुटका नदीवर एक भव्य पूल बांधला गेला. ‘उगवत्या सुर्याचा पूल’ या नावाने दक्षिण अमेरीकेतील हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या भागातील निसर्गाचा लहरीपणा ठाऊक असल्यामुळे हा पूल बांधण्यापूर्वी जगभरातून निविदा मागवण्यात आल्या. प्रतिकूल परिस्थितीतही हा पूल चांगला रहावा या करीता अत्यंत काटेकोरपणे निविदा तपासण्यात आल्या. जपानमधील एका नामांकीत इंजिनिअरींग कंपनीला या कामाकरीता पाचारण करण्यात आले. लवकरच या कंपनीने प्रतिकूल परिस्थीतीत टिकाव धरू शकेल असा पूल बनवला. या कामाची पहाणी केल्यानंतर अनेकांनी या पुलाची स्तुती केली.

हा पूल बनवला त्याच वर्षी अक्टोबर मध्ये ‘मिच’ नावाच्या महाभयंकर प्रलयंकारी चक्रीवादळाचा प्रकोप या भागात सुरु झाला. गेल्या शतकात सर्वात जास्त नुकसान करणार्‍या अरिष्टांपैकी हे एक चक्रीवादळ होते. सहा महिन्यात होणारा एकूण पाऊस केवळ चारच दिवसात येथे कोसळला. सुमारे ७५ इंच इतका पाऊस पडल्यानंतर ७००० हून अधीक लोक यामधे मृत्युमुखी पडले तर अनेकजण विस्थापीत झाले. येथील भागातील सर्वच नद्या धोक्याच्या पातळीच्या खूपच वर वाहत होत्या. या प्रलयंकारी प्रकोपामुळे या परिसरातील सर्व इमारती आणि पूल या महापुरात वाहून गेल्या. परंतू नुकत्याच बांधण्यात आलेल्या या पुलाला मात्र काहीही झाले नव्हते. या पुलावर प्रवेश करणार्‍या जमीनीवरील दोन्ही बाजू या महापूरात वाहून गेल्या आणि नदीवरील हा पूल अभंग राहीला. या पुलाच्या दोन्ही बाजूकडील प्रवेशरस्ता सोडला तर हा पूल या महाभयंकर प्रलयातून सही सलामत वाचला होता.

सलग काही दिवस चाललेल्या या महाप्रलयामुळे अजून एक महत्वाची घटना या भागात घडली होती. ती म्हणजे या पुलाखाली असलेल्या नदीने पाण्याच्या प्रचंड दाबामुळे आपले पात्र बदलून टाकले. ही नदी आता पुलाच्या खालून न वाहता एका बाजूने स्वतःचा मार्ग तयार करून मार्गस्थ झाली.

ही नदी आता पुलाच्या खालून न वाहता एका बाजूने स्वतःचा मार्ग तयार करून मार्गस्थ झाली.

या घटनेला आता 22 वर्षे झाली, परंतू करोनाच्या या जग बदलणार्‍या कालखंडात या घटनेची प्रासंगिकता मात्र त्रिकालाबाधीत आहे. अशा पद्धतीने एखादी साधी घटना आपले आयुष्य बदलून टाकू शकते याची कल्पना आपण केली नव्हती. आपला व्यवसाय, परिवार, आपले जगणे यासाठी चोलुटका नदीवरील हा पुल फक्त एक उदाहरण आहे. यापूर्वीही भारतामधे प्राचिन सरस्वती नदी हरीयाणा, राजस्थान व गुजरात या राज्यातून लुप्त झाल्याच्या घटना आपल्याला माहित आहेत. जगण्याच्या मिती बदलल्या नंतर आपल्याला बदलावे लागते, अन्यथा …

आपला व्यवसाय, संपत्ती, कारकिर्द, करीयर इत्यादी अनेक गोष्टींचा हव्यास आणि त्याच्या मर्यादा आपण ठरवायला नको का? आपल्या करीयर मधे एखाद्या विषयातील (स्पेशलायझेशन) विशेषतज्ञता, त्यातील आपले असणारे ज्ञान कोणत्याही क्षणाला निरर्थक ठरु शकते याचे भान आपण सर्वांनी ठेवायलाच हवे. नाही का? बाजारात आलेली प्रत्येक नवी वस्तु आपल्याला का हवी? याचा विचार आपण करायला हवा. व्यवसाय वाढवणे, संपत्ती कमावणे, त्याचा उपभोग घेणे हे नक्कीच आवश्यक आहे परंतू प्रत्येक चौकात आपल्या शाखा असायलाच हव्यात का? याचा विचार करा. चांगला व्यवसाय करण्यासाठी हमरस्त्यावरच दूकान असण्याची आवश्यकता अशीही संपल्यात जमा आहे.

गरज ही शोधाची जननी आहे, हे मान्य तरीदेखिल सर्वोत्कृष्ट वस्तु बनवण्याच्या धडपडीमध्ये मुलभूत समस्या देखील काळानुरुप बदलु शकते याचा आपण विचार करत नाही. आपण कधीही नाश न पावणारा, कणखर आणि पोलादी पूल बनविण्याच्या या उद्योगात इतके मग्न आहोत की ही नदी स्वतःचा मार्ग बदलू शकते असा विचारदेखील आपल्या मनाला शिवत नाही. नदी पार करण्यासाठी इतरही अनेक मार्ग असू शकतात याचा आपल्याला विसर पडतो.

एक दिवस असा येईल की टेलीव्हीजनचा कोणताही उपयोग उरला नसेल. एक दिवस असाही येईल की वाहनांची कोणतीही आवश्यकता उरणार नाही. कोणजाणे, संगणकाला सांगण्यासारखे कोणतेही काम कधी काळी उरणार नाही. अशावेळी लक्षात ठेवायला हवे की हे साध्य नसून ही सर्व साधने किंवा माध्यमे आहेत.

– श्रीनिवास गर्गे

मानवाचे साध्य आहे ते म्हणजे संस्कृती जपण्याचे, भुतलावर प्रेमपूर्वक राहण्याचे, आदराने सर्वांशी वागण्याचे. केवळ मानवजातच नव्हे तर ह्या विश्र्वपसार्‍यात आढळणार्‍या सर्व ज्ञात-अज्ञात सजिवांशी आणि ब्रह्मांडात असणार्‍या प्रत्येक निर्जीव अणु-रेणुंमध्ये ब्रह्मत्व शोधण्याची नितांत आवश्यकता आहे. काही हजार वर्षांपूर्वी आपल्याच पूर्वजांनी स्वतःला (कोऽहम?) ‘मी कोण आहे?’ असा प्रश्न विचारला होता. विचारलेल्या या सनातन प्रश्र्नाचे उत्तर शोधण्याचा अट्टाहास न करता, उत्तर न सापडल्याचे मान्य करून भावी पिढीला याची उकल करु द्यावी.

आंतरजालावर वेगाने प्रसार झालेले यासोबत दिलेले छायाचित्र आपल्या कार्यालयातील दर्शनी भिंतीवर फ्रेम करून लावण्यासारखे आहे. जगात काहीही शाश्वत नाही याची चिरंतन आठवण हे छायाचित्र तुम्हाला कायम करून देईल. आयुष्याचा पेपर सोडवतांना कोणत्याही क्षणी आपल्याला देण्यात आलेली प्रश्र्नपत्रिका कधीही बदलू शकते ही एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. अन्यथा कुठेही न जाणारा कणखर आणि पोलादी “पत्ता माहीत नसलेला रस्ता” हेच आपले प्रारब्ध असेल.

संकलन – श्रीनिवास गर्गे

Loading

One Reply to “पत्ता माहित नसलेला रस्ता”

  1. उत्तम.असेच लिहित रहा.वाट पाहत आहे.
    सध्य स्थितीत मनन करावयाला लावणार विचार
    श्रीनिवास गर्गे अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: