झाझेन – शोध शांततेचा

श्री ज्ञानरायांनी हरिपाठ ‘योगयागविधि | येणें नोहे सिद्धी’ असं म्हटलं आहे. यात त्यांचा योगाला निषेध नाही तर समजून – उमजून करण्याकडे त्यांचा संकेत तर नसेल ? कारण एखादी पायरी वगळून वर चढण्याचा प्रयत्न केला की अडखळायला होतं. 

जपानमधला एक साधक बोकोज आपल्या गुरूजवळ गेला, म्हणाला, ‘माझं मन मोठं अशांत आहे. मला शांत होण्याचा काही उपाय सांगावा. कसं ध्यान करू, उपवास करू, तप करू ?’ गुरु म्हणाले, ‘तू हे सार यापूर्वीही केलं आहेस, थकला नाहीस काय ? ही अशांती तुझ्या करण्याचं फळ आहे. अजूनही करायचं असेल तर माझ्या दारात येऊ नकोस. भटकून ये.’ 

बोकोज म्हणाला, ‘आपल्याला माझ्या वेदनांची कल्पना नाही (!) या मनाला शांत केलंच पाहिजे.’ गुरु म्हणतात, ‘आता या करण्यानं तू आणखी अशांतच होशील. तू काहीच करू नकोस. फक्त माझ्याजवळ बस.’ बोकोजू एक वर्ष गुरूजवळ बसला. दर चार-दोन दिवसांनी विचारायचा, काही तरी मार्ग सांगा असे म्हणायचा. गुरु म्हणायचे, ‘फक्त बस. जपानी शब्द आहे ‘झाझेन.’ याचा अर्थ  Just Sitting (फक्त बसणं). गुरु म्हणायचे, ‘तू आता आणखी काही करू नकोस.’  हळूहळू बोकोजून विचारणं सोडून दिलं. पण गुरूजवळ बसल्यान एक भाव जागला, त्यांना सोडूही शकत नव्हता. गुरु म्हणाले, ‘आता विचारलं तर बाहेर घालवून देईन.’

असं म्हणतात, रिकामं मन सैतानाचे घर असतं. प्रारंभी बोकोजुच्याबाबत हे सार झालं पण एकच विचार किती दिवस करणार? विचार शिळे झाले, हळूहळू वाहून गेले, मन शांत झालं. 

एक दिवस गुरु स्वतःहून बोकोजूजवळ गेले. त्याला म्हणाले, तुझी इच्छा असेल तर तुला एखादी साधना सांगू काय? गुंरूच्या चरणावर लोळण घेत म्हणाला, मोठ्या कष्टाने ‘करण्यापासून’ सुटलो आहे. आता मला समजलं, आता माझी चेष्टा करू नका, काही होण्याचे प्रयत्न, काही करण्याचे प्रयत्नच अशांती निर्माण करतात हे आता समजलं मला. 

अशुद्धी आणि अशांतीने भरलेल्या या जगात आपण विश्रांतीला कसे प्राप्त होणार ? जो थांबून, आपल्यात स्थिरावला, त्याची अशुद्धी नि अशांती वाहूनच जाईल. यालाच झाझेन म्हणतात – फक्त बसणं !

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: