प्रकाशपर्व

दिपावली किंवा दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. भारत, फिजी, गुयाना, मलेशिया, मॉरिशस, ब्रह्मदेश, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, त्रिनिनाद आणि टोबॅको या देशांमध्ये या सणाची अधिकृत सुट्टी दिली जाते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान मधील सिंध प्रांतात अलिकडे दिवाळीची सरकारी सुट्टी अलिकडे मंजूर केली गेली आहे. 

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा सण अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा आहे त्याचप्रमाणे नुकत्याच घडून गेलेल्या महामारीच्या विनाशातून वाचल्यानंतर निराशेकडून आशेकडे नेणार्‍या या उत्सवाकडे बघीतले गेले पाहिजे. घराच्या छतांवर, खिडक्यांवर, मंदिरांच्या कळसांवर, छोट्या मोठ्या इमारतींवर या उत्सवाच्या पार्श्र्वभूमीवर रोशणाई केली जाते. घरे व कार्यालये या सणापूर्वी स्वच्छ केली जातात. नव्याने सजवली जातात. नवनविन वस्त्रे घालून उत्साहाने हा सण साजरा केला जातो. 

भारतातील विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्यामध्ये लक्षणिय असा फरक आहे. विशेषतः उत्तरेकडे आणि पश्र्चिम भागात धनत्रयोदशीपासून दिवाळीची सुरुवात केली जाते. दुसर्‍या दिवशी नरक चतुर्दशी, तिसर्‍या दिवशी लक्ष्मीपूजन तर चौथ्या दिवशी पती पत्नी यांना समर्पित असलेला दिवाळी पाडवा साजरा केला जातो. बहीण भावांमधील जिव्हाळा सांभाळणार्‍या पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जैन लोक देखील दिवाळी साजरी करतात. याच दिवशी महावीरांनी मोक्षप्राप्ती झाली होती. मुघल साम्राज्याच्या तुरुंगातून गुरु हरगोविंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख ‘बंदी छोर’ दिन साजरा केला जातो. नेवार बौद्ध लोक देखील लक्ष्मीची पूजा करून हा दिवस साजरा करतात. 

भारतातील काही प्रदेशांत हिंदू कार्तिक अमावस्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस कठोपनिषदाशी जोडला गेला आहे. या उपनिषदात नचिकेत आणि यमाचा संवाद आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि भौतिकतेकडून अध्यात्मिकतेकडे नेणारा हा संवाद आहे.

हिंदू, जैन, शीख आणि नेवार बौद्ध अशा विविध धर्मांचे लोक जगभरात दिवाळी साजरी करतात. प्रकाशाचा हा सण ज्ञान, आत्मबोध, आत्मिक सुधारणा घडवून आणतो. वाईटाचा प्रतिकार करण्यासाठी, अंधार दूर सारण्यासाठी आणि इतरांप्रती करुणा जागृत करण्यासाठी या प्रकाशपर्वाचे आपण सर्व जण स्वागत करूया.  दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Loading

%d bloggers like this: