सुफी संत राबियाची कथा

एक गोड कथा आहे सुफी संत राबियाची. ही इस्लाम संत परंपरेतली पहिली महिला संत होती असे म्हटले जाते. इराक मध्ये बसरा या गावात तिचा जन्म इसवी सन ७१४ ते ७१८ या दरम्यान झाला. तिचे लहानपण अत्यंत दरिद्री अवस्थेत गेले. तीन बहिणींच्या पाठीवर जन्माला आल्यामुळे तिचे नांव ‘रबिया’ असे ठेवण्यात आले. अरेबीक भाषेत रबिया याचाच अर्थ ‘चवथी/चवथा’ असा होतो.

सुफी संत राबिया बसरी हिची पवित्र कबर पॅलेस्टीन येथे येरुसलेम येथे आहे.

राबिया ही अवलिया संत असल्यामुळे तिच्या असंख्य कथा अध्यात्माच्या क्षितीजावर प्रसिद्ध आहे. तिच्या वृद्धापकाळातली एक अशीच कथा सांगीतली जाते. आपल्या झोपडीच्या बाहेर ती एकदा काहीतरी शोधात होती. आसपासचे लोक तिच्याजवळ आले, चौकशी करत करत जमिनीवर रांगत रांगत सर्वांचा शोध सुरु झाला.  कोणितरी विचारले. काय हरवले आहे? कपडे शिवतांना सुई हरवली आहे.- राबिया म्हणाली

अचानक एक जण राबिया जवळ आला नि विचारता झाला, ‘गल्ली मोठी आहे, अंधारही पडू लागलाय, सुई इतकी लहान आहे, सुई नेमकी पडली तरी कुठं ? राबिया उत्तरली, ‘झोपडीच्या आत.’ सहज प्रतिक्रिया उमटली, ‘वेडी आहेस काय ? सुई झोपडीत पडली असेल तर बाहेर हा शोध कशासाठी चाललाय ?’ राबिया म्हणाली, ‘बाहेर अजून उजेड आहे म्हणून येथेच शोधून घेते, घरात तर अंधार झालाय….’ 

पटकन अनुभवी शब्द आले. ‘येथे प्रकाश असला तरी बाहेर शोधून काय उपयोग ? ती येथे हरवलेलीच नाही तर सापडेल तरी कशी ? याची सोपी पद्धत आहे, घरात जा, दिवा पेटव आणि शोध घे…’ 

राबिया हसू लागली…. 

‘लहान-सहान गोष्टी कशा शोधाव्यात हे तुम्हाला छान कळतं…. आपल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी या शहाणपणाचा उपयोग करा ना… मी तुम्हा सर्वांना आजवर बाहेरच शोधतांना पाहिलय…. मी चांगलं जाणते नि माझा अनुभवही आहे, जे तुम्ही शोधताय ते तुमच्या ‘आत’ हरवलय…. ‘आनंद’ बाहेर शोधण्यात आयुष्य जाईल…. शहाणपणाचा दिवा प्रज्ज्वलित करा…. !’ 

त्या शांत रात्री शोधणारे स्तब्ध झाले… मौनाच्या सागरात उतरले आणि राबिया झोपडीत निघून गेली….

Hazrat Rabia Basri, Rabia Al Basri or simply Rabia Basri.

Loading

%d bloggers like this: