विक्षिप्त संत – गुर्जिएफ

तत्त्वज्ञान क्षेत्रात जगभरात खूप चांगली माणसे होऊन गेली. चार शहाणपणाच्या गोष्टी शिकवल्‍या. फार पूर्वी ख्रिस्तपूर्व ४२५ वर्षांपूर्वी ग्रिसमध्ये असाच एक अवलिया संत ‘सॉक्रेटीस’ होऊन गेला. सॉक्रेटीसनी जगाचे गुढ उलगडून जनतेला सांगितले. मात्र त्याने केलेले कार्य नोंदवण्याचे महत्वाचे कार्य त्यानंतर त्याचा शिष्य ‘प्लेटो’ आणि प्लेटो चा शिष्य ‘अरिस्टोटल’ यांनी केले.  भारतात अगदी अलिकडच्या काळात स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे आध्यात्मिक विचार त्यांचे शिष्य विवेकानंद यांनी पसरवले आणि जगभर नाव कमावले. अश्याच एका गुरु-शिष्य जोडी बद्दल आज आपण वाचणार आहोत.

जॉर्ज गुर्जिएफ, मागच्या शतकाच्या सुरुवातीला रशियात रहाणारे हे एक अद्‍भुत तत्त्वज्ञ होते. आचार्य रजनिशांच्या प्रवचनात यांच्या अनेक कथा आपण वाचल्या अथवा ऐकल्या असतील. गुर्जिएफ हा एक बंडखोर संत म्हणून ओळखला जातो कारण तो त्याच्या विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध होता. 

त्याच्या विक्षिप्तपणाच्या अनेक कथा प्रचलित आहेत. उदाहरणार्थ, शहरातील एखाद्या हॉलमध्ये त्यांचे शिष्य गुर्जिएफचे प्रवचन ठेवायचे. शनिवारी सायंकाळी ६ वाजता असे प्रवचन ठेवले जायचे. या प्रवचनाला गर्दी व्हायची मात्र एखाद्याला १ मिनीट जरी उशीर झाला तरी दरवाजे बंद केले जायचे. आत बसलेली लोक गुर्जीएफची आतुरतेने वाट बघायची. दर १५ मिनिटांनी त्याचे शिष्य येऊन ‘गुर्जिएफ येत आहेत’ अशी ललकारी देऊन जायची. लोक ताटकळत बसायची. रात्री उशिरा ते शिष्य येऊन मग सांगत असत की आज गुर्जिएफ येणार नाही, मात्र त्याचे प्रवचन उद्या दुपारी १२ वाजता येथून जवळ असलेल्या दुसर्‍या शहरात ठेवले आहे. ताटकळलेल्या लोकांपैकी अगदी थोडेच लोक त्या जवळच्या दुसर्‍या शहराला निघत असत. त्या पुढच्या शहरातही असेच घडे. लोक ताटकळत बसत आणि नंतर शिष्यांनी घोषित केलेल्या नव्या शहराकडे त्यातले फार थोडे लोक जात असत. मग कधितरी गुर्जिएफ प्रवचनस्थळी येई आणि म्हणत असे ‘मला फक्त या उरलेल्या ५-१० लोकांसोबत बोलायचे आहे. जे फक्त मनोरंजनासाठी आले होते ते गेले’ आणि मग ते या ५-१० लोकांसोबत संवाद साधत असत. 

खरतरं विक्षिप्तपणामुळे ‘गुर्जिएफ’ प्रसिद्ध होता मात्र याच कारणामुळे तो लोकांचा लाडका संत बनु शकला नव्हता. नंतरच्या काळात गुर्जिएफला प्रसिद्ध करण्यामागे त्याच्याच एका शिष्याच हात होता. ‘पी. डी. ओस्पेन्स्की’ असे त्यांचे नांव होते. गुर्जिएफचा पट्टशिष्य या नात्याने ओस्पेन्स्की जगभर ओळखले जातात. ओस्पेन्स्की याने गुर्जिएफ ने विषद केलेले तत्त्वज्ञान सांगणारी व गुरुजींच्या महानतेची प्रशंसा करणारी अनेक पुस्तके लिहिली आहेत. 

P. D. Ouspensky (1878-1947)

असाच एक गुरु-शिष्याचा किस्सा त्यांच्या बाबतीत सांगितला जातो. पहिल्या महायुद्धाच्या काळात ओस्पेन्स्की काही कामामुळे इंग्लंडमध्ये होता. महायुद्धाच्या या कठिण काळात प्रवास करणे शक्य नव्हते. गुर्जिएफ तेव्हा रशियाच्या दुर्गम भागात रहात होते. त्यांनी ओस्पेन्स्कीला ताबडतोब रशियामध्ये येण्यासाठी तातडीची तार पाठवली. गुरुची आज्ञा आल्यामुळे आपला जीव धोक्यात घालून युरोप व रशियातून प्रवास करीत तो गुरुपाशी पोहचला. गुर्जिएफ त्याला पाहून म्हणाला ‘‘अरे, आलास? ठिक आहे आता तु परत जाऊ शकतो. गुर्जिएफच्या अशा विक्षिप्त वागण्यामुळे ओस्पेन्स्कीचा तोल गेला. त्याने गुर्जिएफला कायमचे सोडायचे ठरवले. पुढे याच ओस्पेन्स्कीने आपल्या गुरुची निंदा करणारे एक पुस्तक देखील लिहीले. यावर गुर्जिएफ फक्त एवढेच म्हणाला ‘‘तो मूर्ख होता, मी जा म्हटल्यावर ‘तोल ढळू न देता’ तो गेला असता तर दिव्यत्वाची अनुभूती त्याला झाली असती. दिव्यत्वाच्या खूप जवळ तो पोहचला होता. पण मूर्ख निघून गेला.’’

Loading

%d bloggers like this: