अनंतपूरमचा सुंदर रामैया ते हिमालयातील ‘फोटोग्राफर बाबा’ स्वामी सुंदरानंद… हा प्रवास मोठा अद्भूत आहे. ही यात्रा जशी आंतरिक आहे तशी बहिरंग यात्राही आहे. सदगुरू, साधना, सत्य आणि संघर्ष (साहस) या चार स्तंभांच्या आधाराने ती वाटचाल करते. ही यात्रा आहे एका तपस्व्याची योग्याची, विरक्त संन्याशाची, हठ योग्याची, गिर्यारोहकाची, सौंदर्यासक्त रसिकाची, हिमालयातील दुर्मिळ वनस्पतींच्या ज्ञात्याची, पर्यावरण समतोलासाठी तळमळणार्या प्रहरीची आणि त्यातून जन्म पावलेल्या एका छायाचित्रकार साधूची !
साधू आणि कॅमेरा हे समीकरण साठ-पासष्ट वर्षांपूर्वी अजब समजले जायचे! अनेक लोकापवादांशी सामना करीत स्वामी सुंदरानंद यांनी ते स्वीकारले. हिमालयातील गंगा आणि निसर्गाच्या प्रेमापोटी अनासक्त साधू ‘आसक्त’ झाला. साधना-गिरिभ्रमण-छायाचित्रकार हा त्यांचा प्रवास पूर्णपणे एकट्याचा आहे. या निःसंग वृत्तीमुळे त्यांच्याभोवती मठ वा आश्रम उभा राहिला नाही. हिमालयाला गुरू मानल्याने आलेल्या विशालतेतून एक नम्रता त्यांच्या ठायी आली. स्वतःचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आणि संप्रदाय नसल्याने शिष्यांचा गोतावळा उभा करण्याच्या उद्योगात ते पडलेच नाहीत. त्यामुळे उत्तराधिकारीही नाही. आश्रम, शिष्य आणि भक्त हे साधूसाठी भोगविलास आहे, असे ते सांगत असतात.
आपले, शरीर हे रक्त-मांसाचा गोळा आहे, त्याच्याबद्दल आसक्ती नको. सारे काही माया आहे, सारे अस्तित्व अनित्य आहे. उपभोग निवृत्ती हेच जीवनाचे तत्त्वज्ञान आहे, नित्य सत्य आहे ते केवळ ब्रम्ह ! असे पारंपारिक ज्ञानाचे बाळकडू घेऊन आंध्र प्रदेशाच्या नेल्लोर जिल्ह्यातील अनंतपूरम या छोट्या गावातील गरीब कुटुंबात जन्मलेला सुंदर रामैया ईश्वराच्या आणि गुरुंच्या शोधात निघाला. देवभूमी हिमालयाचे प्रवेशद्वार असलेल्या हरिद्वारला पोहोचला. गेल्या शतकातील अद्वैत वेदान्ताचे प्रखर भाष्यकार, चिन्मय मिशनचे संस्थापक स्वामी चिन्मयानंद यांचे गुरू पूज्य स्वामी तपोवन महाराज यांच्या चरणी सुंदरच्या यात्रेची सांगता झाली. 1947 च्या सुमाराची ही घटना.
‘हिमगिरी विहार’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेल्या तपोवन महाराजांसोबत सुंदर रामैयाचे हिमालय भ्रमण, गिर्यारोहण सुरू झाले. सोबत गुरूसेवा, ध्यान साधना, आसन-प्राणायामादि हठयोग सुरूच होते. पुढच्याच वर्षी गुरुंची तपोभूमी असलेल्या गंगोत्रीला तो पोहोचला आणि हिमालयातील दैवी सौंदर्याने मोहीत झाला. या यात्रेतच रामैयाचे ‘ब्रह्मचारी स्वामी सुंदरानंद’ असे नामकरण झाले आणि ते हिमालयाचेच होऊन गेले. आज सत्तर वर्षे गंगोत्री हीच त्याची तपोभूमी आणि कर्मभूमी झाली आहे.
स्वामी सुंदरानंद यांचा पुढील पाच वर्षांचा काळ गंगोत्रीतील एकान्त, योगसाधना आणि गुरूंसोबत गोमुख, तपोवन, नंदनवन, सुंदरवन, केदारताल, रुद्रगंगा इत्यादी क्षेत्रातील भ्रमणाचा होता. या हिमालय भ्रमणात आजच्यासारखी साधन-सुविधा नव्हती. हिमालयातील पर्वतारोहण म्हणजे मृत्यू असे समीकरण होते. अशावेळी लष्करी जवानांकडून मागून आणलेले बूट, कंबल (घोंगडी) आणि काठी एवढीच आयुधं ! प्रचंड बर्फवृष्टीच्या काळात सतत पाच वर्षे, बाराही महिने गंगोत्रीतच वास्तव्य करणारा साधू म्हणून सुंदरानंद यांची ख्याती झाली. सर्व ऋतू, सूर्योदय- सूर्यास्त-मध्यरात्री. सृष्टीचे नर्तन यांतून ते हिमालयाकडे आधिकाधिक ओढले गेले आणि तेथे जन्म झाला एका फोटोग्राफर साधूचा !
ती कथाही अदम्य साहसाची, ईश्वर निष्ठेची आणि निसर्ग- समर्पणाची आहे. गुरुसोबत केलेले गिरिभ्रमण ही साधना होती. पुढे गुरुंनी उत्तरकाशीत क्षेत्रसंन्यास घेतला आणि हिमगिरी विहाराचा वसा स्वामी सुंदरानंद यांनी घेतला. गंगोत्री, गोमुख, नंदनवन, सतोपंथ, सुराली, सीता, कालिंदी पास, गस्तोली, माना आणि बद्रीनाथ हा हिमालयातील पंधरा हजार ते एकोणीस हजार फुटांवरून जाणारा बर्फाच्छादित मार्ग ‘देवमार्ग’ म्हणून ओळखला जातो. स्वामींसह सात जणांच्या पथकाने संकल्प केला आणि हिमप्रवास सुरू झाला. प्रचंड वारा, बर्फाची वादळे अंगावर झेलत पथक कालिंदी पास येथे (19500 फूट) पोहोचले. एक ग्लेशियर ओलांडताना, सहकार्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात स्वामीजी बर्फाच्या एका खोल विहिरीत (हिमनदीवरील विवर) पडले. साक्षात मृत्यूशी झुंज सुरू झाली. सुमारे दीड तास ती चालली. जखमांचे रक्तही गोठले. गुरू आणि ईश्वराचा धावा सुरू झाला. त्यांची कृपा झाली आणि स्वामीजी मृत्युंजय ठरले. हिम-समाधी टळली. त्यांनी या ‘मृत्यूच्या विहिरीचा’ फोटो घ्या आणि मला द्या, अशी विनंती पथकातील सदस्याला केली. आपले फाटलेले भगवे वस्त्र एका काठीला अडकवून तेथे रोवले. मोहीम पूर्ण झाली. 1955 ची ही गोष्ट. त्यानंतर स्वामींनी फोटोची वाट पाहिली; पण व्यर्थ.
अखेर 1956 मध्ये त्यांनी ऋषिकेशला जाऊन स्वामी शारदानंद यांच्याकडून बॉक्स कॅमेरा विकत घेतला. किंमत होती 25 रुपये ! पुन्हा साधूंचा एक जथा घेऊन पुढच्याच वर्षी स्वामी देवमार्गावर प्रस्थान करते झाले; पण आता सोबतीला होता कॅमेरा. मृत्यूच्या विहिरीचे छायाचित्र त्यांनी टिपले आणि गिर्यारोहक साधू आणि फोटोग्राफर बाबा यांचा दीर्घ प्रवास सुरू झाला. येथे एका साहसाची नोंद करावी लागेल. गोमुख ते बद्रिनाथ आणि तेथून पुन्हा त्याच मार्गाने गोमुखला परतणारे ते पहिले भारतीय ठरले. पुढे त्यांनी लष्करासह अनेक पथकांसोबत किमान दहा वेळा ही मोहीम यशस्वी केली. साधू-संन्याशाने सौंदर्यापासून दूर राहावे, असा दंडक पण या साधूने पुढे 65 वर्षे संपूर्ण हिमालय, त्यांची दिव्य शिखरे आणि निसर्ग पिंजून काढला. आपल्या कॅमेराने सौन्दर्य टिपत राहिला. त्या फोटोंची, पारदर्शिकांची, निगेटिव्हजची संख्या आज दीड लाखांवर (5 क्विंटल) पोहोचली आहे. नित्य बदलणार्या समृध्द हिमालयाचा हा अमूल वारसा आहे. तो काळ डिजीटल कॅमेरे, मेमरी कार्ड आणि प्रत्येक क्षण शेअर करण्याची घाई असलेल्या फेसबुक संस्कृतीचा नव्हता. मोठ्या मोहिमांवर जाताना सोबत त्यावेळी परवडणारा कॅमेरा, झोळीला परवडतील तेवढेच पैसे खर्चून घेतलेले मोजकेच रोल असायचे. डिलीटची सोय नव्हती. शिखरे पाहायची, सौंदर्य न्याहाळायचे आणि याचवेळी कॅमेरात किती स्नॅप उरले याची मोजदाद ठेवायची; त्यामुळे काही साठवले जायचे आणि बरेच सुटूनही जायचे. म्हणून आज या लाखांवर असलेल्या छायाचित्रांचे महात्म्य आहे. साधू संग्रहमुक्त हवा हे तत्त्वज्ञान त्यांनी पाळले आणि ही दुर्मिळ छायाचित्रांची समृद्धी त्यांनी जगाला अर्पण करून टाकली आहे.
या निसर्ग-साक्षात्कारी साधूला हिमालय कसा दिसला, पृथ्वीचा मानदंड असलेल्या उत्तर दिशेच्या नगाधिराजाला-हिमालयाला कवकिुलगुरू कालिदासाने ‘देवतात्मा’ म्हटले आहे. भगवद्गीतेतील विभूतियोगात, सकल स्थावरांत ‘हिमालय’ ही परमात्म्याची दिव्य देणगी आहे, असे भगवान म्हणतात. तो हिमालय अनुभवून स्वामींनी प्रार्थना केली-
अनेक बाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतो नन्तरूपम।
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरुप ॥
अर्थात हे संपूर्ण विश्वाच्या स्वामी (नगाधिराज हिमालया)! मी आपल्याला अनेक बाहू, उदर, मुख आणि डोळे असलेले, तसेच सर्व बाजूंनी अनंतरूपे असलेले पाहात आहे. हे विश्वरूपा (हिमालया)! मला ना आपला आरंभ दिसतो, ना मध्य, ना अंत दिसतो. म्हणूनच 65 वर्षे हिमालय निवासून आणि अनुभवून आपल्या कॅमेरात टिपल्यानंतरही त्यांच्यासाठी तो पुरूषसूक्तात वर्णिल्याप्रमाणे ‘दशांगुलम’ उरला आहे. गंगोत्री ते गोमुख अशी बारा हजार फुटांवरील यात्रा 108 वेळा केल्यानंतरही आपण हे सौंदर्य भौतिक कॅमेरात साठवू शकलो नाही, अशी अतृप्ती त्यांच्यात, आज वयाच्या 94 व्या वर्षी आहे. भगिरथ पर्वत, जोगीन, कोटेश्वर, केदार डोम, चंद्र पर्वत, कुमायूँ नंदा, बलजोरी, कबू, शिवलिंग, मेरू, सुमेरू, वासुकि, चतुरंगी, कालिंदी, पुलम सिंधु, थागला, नीलमणी, झेलू… अशी किती शिखर आणि परिसरांची नावे घ्यावीत. हा सारा परिसर त्यांनी पिंजून काढला. शिखर सर केली आणि भिंगातून प्रकाशचित्रात परिवर्तीत केला.
गुरूच्या सेवेसाठी वयाच्या तेवीसाव्या वर्षी हिमालयात पोहोचलेल्या या साधूने पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांचे अद्वैत येथेच अनुभवले. प्रतिक्षण बदलणारे वातावरण, निगूढ शांती आणि ढगफुटीचे तांडव, विजांचे नर्तन आणि श्वेत अंधार, हिमशिखरांवरील सूर्य-चंद्रांच्या प्रकाशाची क्रीडा आणि भरदिवसा नक्षत्र दर्शन, बर्फाचे धवल पर्जन्य, महाकाय भूस्खलन, गाव-वस्त्या-डोंगर गिळंकृत करणार्या नद्यांचा राक्षसी प्रवाह आणि त्याचवेळी खळखळणारी गीते, निबीड अंधार, पक्षांचे कुजन आणि श्वापदेही, श्वेत-रक्त ब्रह्मकमळे आणि रात्री प्रकाशणार्या दिव्य वनस्पती, शिखरे आणि आकाशाचे नील-मिलन, श्वेत आणि कृष्ण मेघांचा विहार, देवदाराच्या उंचीत हरवलेले आकाश, सर्व ऋतूंशी सलगी करणारा वारा, वृक्ष-वार्यांच्या, व संगमातून निर्माण झालेले संगीत, भागिरथी, अलकनंदा, मंदाकिनी, यमुना, काली, सरस्वती, भिलांगना, धौलगंगा, नंदाकिनी, पिंडरा इत्यादी लहान-मोठ्या नद्यांच्या खोर्यांना सौंदर्य देणारी अनंतरंगी फुले… असा पंचमहाभुतांचा महा-रास त्यांनी अनुभवला. देवदारातून वाहणार्या ध्वनी त्यांचे
हिमालयाचा प्रहरी
सुंदरानंदजी हे हिमालय, गंगा आणि तेथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तळमळणार्या एक प्रहरी आहेत. आधुनिकतेचा हव्यास आणि बेधुंंद उपभोगवदा यामुळे हिमनग वितळत आहेत. हिमालय आणि गंगेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे, असे ते म्हणतात. साठ वर्षांपूर्वी गंगोत्रीला आलो आणि येथील शांतता आणि सौंदर्याच्या मोहात पडून हिमालयवासीच झालो. हिमालय हेच माझे मंदिर, आश्रम आणि परमधाम झाले; पण आज आपण ते सारे पर्याावरण माणसाच्या लालसा आणि क्रौर्याने गमावून बसलो आहोत. दरवर्षी हिमालयातील उष्णता वाढते आहे आणि दुसरीकडे गंगेच्या उगमाशीच प्रदूषण वाढले आहे. पर्यटनाच्या नावाखाली गंगात्रीपर्यंत हॉटेल्स आणि आश्रमांची अनियंत्रित बांधकामे होत आहेत. हिवाळ्यात सदा महिने यात्रा थांबते तेव्हा पुढील काही महिने मानवनिर्मित कचरा आणि बांधकामांचा मलबा स्वच्छ करण्यातच महिने लोटतात.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे (जागतिक तापमानवाढ) गोमुख हे, भागिरथी-गंगेचे मूळ उगमस्थान मागे मागे सरकत आहे. हे ग्लोबल वॉर्मिंग नसून ग्लोबल वॉर्निंग (इशारा) आहे. आता येथे कोणीही पर्यावरणप्रेमी उरले नाहीत. आहेत ते फक्त पैसा-प्रेमी याचसाठी स्वामीजी आपल्या स्लाईड शोमध्ये हिमालयातील सौंदर्याचे दर्शन घडविताना जनतेला पर्यावरण समतोल आणि प्रदूषणाबद्दल जागे करीत असतात. अर्थात हा त्यांचा लढा एकाकी आहे… ते एकटेच लढत आहेत…
मंत्र झाले, भागिरथी-गंगेच्या गंगारवाने त्या मंत्रांना लय दिली, निगूढ शांती त्यांना समाधीचा आनंद देऊन गेली आणि प्रत्येक सूर्योदय-माध्यान्ह-सूर्यास्त-मध्यरात्र यावेळी हिमशिखरांवर होणारे प्रकाशनर्तन आणि ढगांचे बदलणारे आकार हेच त्यांच्यासाठी देवदर्शन झाले. सार्या विश्वाशी एकरूप होणारा त्यांचा अद्वैत वेदान्त असा हिमालयातून प्रकटला, अंतःकरणात स्थिरावला.
स्वामींनी 1949 साली गंगोत्रीचे प्रथम दर्शन घेतले. गुरू तपोवन महाराजांची कुटी भागिरथीच्या काठावर विराजमान आहे. हीच ‘तपोवन कुटी’ पुढील सात दर्शक जगभरातील गिर्यारोहक, योगप्रेमी, पर्यटक, छायाचित्रकार, समाजपुरूष, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ आणि हिमालयप्रेमी लेखकांसाठी ‘तीर्थस्थान’ झाले. अनाम मार्ग, अनाम शिखरे, ती शोधण्याची दुर्दम्य इच्छा आणि कोणतीही साधने नसताना ऑक्सिजनशिवाय 21 हजार फुटापर्यंत चढाई करण्याचे साहस करणार्या स्वामींनी 1965 पर्यंत गिर्यारोहण आणि गिरिभ्रमणाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते.
या समृद्धीतून त्यांच्यातील छायाचित्रकाराप्रमाणे लेखकाचा जन्म झाला. 1965 पासून उत्तर भारतातील विविध वृत्तपत्रात आणि मासिकात त्यांचे हिमालय छायाचित्रेची-प्रवासवर्णने प्रसिद्ध झाली आहेत. त्याचबरोबर परदेशातील प्रमुख मासिकांमध्ये मुलाखती प्रसिद्ध झाल्या. सारिका, सरिता, धर्मयुग, हिंदुस्तान, नवभारत टाईम्स, इंडिया टूडे, इलेस्ट्रोडेट विकली, दै. हिंदुस्तान, एअर इंडिया गृहपत्रिका, जनसत्ता, टाईम्स ऑफ इंडिया, आंनद बाजार पत्रिका, हूज हू, इंटरनॅशनल जिओग्राफिक, इस्टर्न योगा ही काही नावे. जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या एन. एच. के. वर्ल्डने 1962 ला गोमुख ते गंगासागर ही फिल्म स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली तयार केली आणि त्यातून हे ‘बर्फाच्छादित अस्तित्व’ सार्या जगाला कळले. त्यानंतर जपान, चीन, युरोप देश, अमेरिकेतील पर्यटक गंगोत्रीला पोहोचू लागले. प्रसिद्ध दिग्दर्शक व्हिक्टर डेम्कोने स्वामीजींच्या जीवनावर ‘पर्सनल टाईम विद् स्वामी’ हा माहितीपट तयार केला. डिस्कवरी चॅनलवर तो प्रदर्शित करण्यात आला. अमेरिकेतील डेव्हिड लेस (सच्चिदानंद स्वामी) यांनी स्वामीजींच्या सान्निध्यात आणि मार्गदर्शनाखाली ‘युनिव्हर्सल मेडिटेशन’ हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला. प्रसिध्द हिंदी लेखक विष्णू प्रभाकर यांचे ‘ज्योतिपुज हिमालय,’ पद्मा सचदेव यांचे ‘भटकन भरे पाव,’ ‘जाना है गंगा के गाव’ ही पुस्तके स्वामीजींच्या जीवनाचे दर्शन घडवितात. याशिवाय बी.बी.सी., जर्मन टीव्ही, इटली यांनी त्यांच्यावर माहितीपट तयार केले.
पण या सर्व मान-सन्मान-प्रसिध्दीचा कळसाध्याय म्हणजे स्वामीजींनी लिहिलेले ‘हिमालय’ : थ्रू द लेन्स ऑफ अ साधू’ हे कॉफी बुक. सुमारे 45 वर्षे टिपलेल्या प्रकाशचित्रांतील निवडक 425 चित्रांचा हा अनुपम संग्रह आहे. त्याला स्वामींचे ओघवते निवेदन आहे. अनेकानेक ज्ञात-अज्ञात गोष्टी प्रकट करणार्या ग्रंथाचे प्रकाशन दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी (2001) केले. याशिवाय स्वामीजींना आग्रह झाल्यानंतर वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी ‘हिमालय के सन्त’ हे 377 पृष्ठांचे आत्मकथन लिहिले आणि प्रकाशितही केले.
- उत्तरकाशीत 1965 साली स्थापन झालेल्या ‘नेहरू पर्वतारोहण संस्थेचे’ ते पहिले संन्याशी विद्यार्थी. त्यांनी एव्हरेस्टवीर तेनसिंग यांच्याकडून शिक्षण घेतले. याच संस्थेचे ते मानद संचालक होते आणि एव्हरेस्ट कन्या बचिंद्री पालचे प्रशिक्षकही होते. तत्पूर्वी संपूर्ण हिमालयातील दुर्गम रस्त्यांची खडा न खडा माहिती असल्याने 1962 च्या भारत-चीन युध्दानंतर, भारतीय लष्कराच्या जवानांना मार्गदर्शन केले.
- देश-विदेशातील गिर्याराहकांप्रमाणेच लष्करातील अधिकारी आणि जवानांसोबत त्यांनी मोहिमा केल्या. लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी स्वामींकडून लहानपणी योगासनांचे धडे घेतले आणि योगायोगाने नेहरू संस्थेचे ते संचालक असताना जनरल सिंह यांना गिर्यारोहणाचे धडेही स्वामींनी दिले.
- पर्वतारोहणाने आपल्याला मान दिला, सन्मान दिला, संकल्पशक्ती दिली, संघर्षाची क्षमता दिली आणि शिवसान्निध्य दिले, संघर्षाची क्षमता दिली आणि शिवसान्निध्य दिले, असे ते मानतात.
हिमालयात गोमुखला उगम पावलेली भागिरथी-गंगा अनेक दर्या-खोर्यांशी क्रीडा करीत ऋषिकेशजवळ देवप्रयागला ‘गंगा’ होते. पुढे अनेक डोंगर-दर्या-मैदानांना पार करीत, कधी नव्या वाटा तयार करीत, किनार्यांना जन्म देत बंगालच्या उपसागरात विसर्जित होते. ती या प्रवासात निसर्ग उभा करते, कृषी-संस्कृती-समाज-इतिहास लिहिते आणि एका समृद्ध वारशाची साक्षीदार होते. स्वामी सुुंदरानंद यांनी गंगा-हिमालयाचे हेच वैभव जन-साधारणांमध्ये वितरित केले आहे. आपल्या हजारो छायाचित्रांतील निवडक छायाचित्रे आणि सहज सोपे निवेदन घेऊन त्यांनी देशभरात शेकडो प्रदर्शने आणि स्लाईड शो केले. त्यांचा प्रारंभ स्वतःच्याच जन्मदिवशी-रामनवमीला (1970) नवी दिल्ली येथे केला आणि शरीर थकले तेव्हा 2009 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईत सांगता झाली. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय व निवासस्थान, संसद भवन, अनेक राज्यांची विधान भवने, शासकीय-निमशासकीय, लष्करी कार्यालये, शैक्षणिक संस्था, मठ-मंदिरे, कलादालने इत्यादी ठिकाणी ही प्रदर्शने झाली आहेत. ‘हिमालयाचे आमंत्रण देण्यासाठी, ज्यांना हिमालयात पोहोचणे शक्य नाही त्यांच्यासाठी, हिमालयाची समृद्धी आणि पर्यावरण संतुलनाची हाक प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण एकट्याने हे स्लाईड शो केले,’ असे स्वामीजी सांगतात. ते आजही बालकाच्या कुतूहलाने तासनतास हिमालयाबद्दल बोलतात.
साधू आणि कॅमेरा हे समीकरण साठ-पासष्ट वर्षांपूर्वी अजब समजले जायचे! अनेक लोकापवादांश्ी सामना करीत स्वामी सुंदरानंद यांनी ते स्वीकारले. हिमालयातील गंगा आणि निसर्गाच्या प्रेमापोटी अनासक्त साधू ‘आसक्त’ झाला. साधना-गिरिभ्रमण-छायाचित्रकार हा त्यांचा प्रवास पूर्णपणे एकट्याचा आहे. या निःसंग वृत्तीमुळे त्यांच्याभोवती मठ वा आश्रम उभा राहिला नाही. हिमालयाला गुरू मानल्याने आलेल्या विशालतेतून एक नम्रता त्यांच्या ठायी आली. स्वतःचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आणि संप्रदाय नसल्याने शिष्यांचा गोतावळा उभा करण्याच्या उद्योगात ते पडलेच नाहीत. त्यामुळे उत्तराधिकारीही नाही. आश्रम, शिष्य आणि भक्त हे साधूसाठी भोगविलास आहे, असे ते सांगत असतात.